पुणे - ‘आजच्या काळात आरोग्यावरील उपचार म्हणजे बाजारातील चकचकीत शोरूममध्ये पैशांचे लेबल लावून ठेवलेल्या वस्तू आहेत. उपचार घेतले नाही तर मृत्यू अन् घ्यायला गेले तर आर्थिक मृत्यू, अशा प्रकारच्या इकडे आड व तिकडे विहीर आरोग्य परिस्थितीत सर्वसामान्य माणूस सापडला आहे.
पाश्चात्त्य देशांच्या आरोग्यसेवेच्या महागड्या मॉडेलचे अनुकरण भारतीय आरोग्य सेवा करू पाहत आहे. प्रत्यक्षात ती परवडणाऱ्या दरात व्हायला हवी’, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
डॉ. अभय बंग लिखित व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘आरोग्य स्वराज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृहात झाले त्यावेळी आयोजित व्याख्यानात त्यांनी विचार व्यक्त केले. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक दिलीप माजगावकर, ‘राजहंस प्रकाशन’च्या संपादक करुणा गोखले, प्रेक्षकातून निवडलेल्या भाग्यवान वाचक साक्षी भोसले, डॉ. कल्याणी मांडके व अक्षरधारा बुक गॅलरी च्या संचालिका रसिका राठीवडेकर यांच्या हस्ते झाले.
सध्याच्या आरोग्यव्यवस्थेवर मत व्यक्त करताना डॉ. बंग म्हणाले, कुपोषण व आजारांवर आरोग्य सेवा वेळेवर न मिळाल्याने आदिवासी पाडे, झोपडपट्ट्यांमध्ये लहान मुलांचे मृत्यू आणि बदलत्या जीवनशैलीने प्रौढांमध्ये हृदयरोगासह असंसर्गजन्य आजाराने ५० टक्के मृत्यू हे भारतात होत आहेत.
आज वैद्यकीय उपचारांनी आयुर्मान वाढले असले तरी लोक रक्तदाब, मधुमेह असे सोबत चार ते पाच आजार घेउन जगत आहेत. पूर्वीच्या देवी, कॉलरा या संसर्गजन्य आजारांची जागा आता असंसर्गजन्य आजारांनी घेतली आहे. याचे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, घरच्या खाद्यपदार्थांची जागा बाजाराधारित खाद्यपदार्थांनी घेतल्याने तसेच व्यसने हे आहे.
परंतु, आपण दररोज अर्धा तास चाललो तरीही या आजारांचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो’’ यावेळी त्यांनी गडचिरोली येथे बालमृत्यू रोखण्यासाठी सूरू केलेल्या व जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या ‘आई, दाई, ताई, भाई’ या मॉडेलबाबतही माहिती दिली. यावेळी, डॉ. कल्याणी मांडके, करुणा गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले.
निरोगी जीवन जगण्यासाठी उपाययोजनांबाबत डॉ. बंग म्हणाले,
– शक्यतो उपचारांची गरज पडू नये अशी जीवनशैली असावी, निरोगी सवयींचा अवलंब करा
– त्यामध्ये व्यायाम, सकस खाणे, व्यसन न करणे, तणावरहित जीवन अवलंबावे
– उपचारांची गरज पडलीच तर ती जवळ, निःशुल्क किंवा परवडणाऱ्या दरांत हवी
– अमेरिकेत प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ती आरोग्यावरील खर्च ९ लाख तर भारतात १० हजार
– भारतीय आरोग्यसेवा ही ‘स्वस्थ’ म्हणजे ‘स्व मध्ये स्थित असणे’ होय
– आरोग्य स्वराज्य म्हणजे निरोगी जीवन जगणे व उपचारांची गरज पडल्यास सामुदायिक आरोग्यसेवा निर्माण करणे