नव्या पादचारी पुलावर कचऱ्याचे ढीग
अंबरनाथमधील दुर्गंधीमुळे प्रवाशांचे हाल; नागरिकांची नाराजी
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी नव्याने उभारण्यात आलेला पादचारी पूल अवघ्या काही दिवसांतच अस्वच्छतेमुळे चर्चेत आला आहे. स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावर सध्या अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले असून, सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांचा जीव त्रस्त झाला आहे.
कर्जत-कल्याण तिसरी व चौथी मार्गिका प्रकल्पामुळे हा नवा पादचारी पूल तातडीने बांधण्यात आला आहे. जुन्या पुलाचे निष्कासन सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने नव्या पुलातील एक लेन प्रवाशांच्या वापरासाठी खुली केली, मात्र या पुलाच्या कडेला, जिन्याजवळ आणि वॉक-वेवर केवळ काही दिवसांतच प्लॅस्टिकच्या पिशव्या, कुजलेल्या फुलांचा खच, चिप्स-पाण्याच्या बाटल्या तसेच तंबाखू-गुटख्यांच्या पिचकाऱ्या दिसू लागल्या आहेत.
पुलावर अनेकदा तात्पुरते बसणारे फेरीवाले आणि त्यांच्या दुकानातील तसेच ग्राहकांनी फेकलेल्या वस्तूंमुळे कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. पूल सुरू झाल्याचा आनंद किती दिवस टिकणार? सकाळी ऑफिसला जाताना इथली दुर्गंधी सहन होत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. कचरा साचल्याने केवळ अस्वच्छता नव्हे, तर रोगराईचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या दुर्गंधीचा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका
रेल्वेने इतका मोठा प्रकल्प उभारला, पण स्वच्छतेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत आहे, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. पुलाची नियमित स्वच्छता करण्यासाठी आणि तात्पुरत्या फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने, स्थानिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे. ‘‘सुरक्षित प्रवासासाठी बांधलेल्या पुलावरच कचऱ्याचा सडा पडणे, हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नमुना आहे,’’ असे स्थानिक नागरिक बोलत आहेत.