मालेगाव: शहरात बनावट नोटा पकडण्याचा दुसरा प्रकार येथे घडला आहे. यापूर्वी शहरात दहा लाख रुपये आणणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा तपासदेखील सुरू असून, मध्य प्रदेश राज्यातील दोन जण फरारी आहेत. अद्यापही पोलिसांना ते मिळाले नाहीत. त्यातच येथील किल्ला पोलिस ठाणे हद्दीतील तांबा काटा परिसरात वर्धा येथील दोघे तरुण शहरात बनावट नोटा घेऊन आले होते.
पोलिसांना त्याचा सुगावा लागला. सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांविरोधात किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
येथील तांबा काटाजवळील वैष्णवी इलेक्ट्रिक दुकानासमोरील रस्त्यावर धनराज नारायण धोटे (वय २०, कानगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा), राहुल कृष्णराव आंबटकर (वय २५, रा. कारला चौक, सावजीनगर, वर्धा) हे दोन जण शहरात बनावट नोटा घेऊन आले होते. तत्पूर्वी पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
यातील धनराज धोटे याच्याकडील पिशवीत ५०० रुपये किमतीच्या एक हजार ८७ नोटा, तसेच शंभरच्या ३०, दोनशेच्या ५० अशा ८० नोटा पोलिसांना मिळून आल्या. पोलिसांना पाच लाख ५६ हजार ५०० रुपयाचा नोटा मिळून आल्या आहेत. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेचा तपास किल्ला पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भूषण चव्हाण करीत आहेत. सदरील प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री घडला आहे.
Crime News: निवडणुकीच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलिसही चक्रावले; कारवाईत एकाला अटक!शहरात बनावट नोटांची दुसरी कारवाई
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे यापूर्वी शहरात दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांचे धागेदोरे मध्य प्रदेश राज्यातील चौघे मालेगाव व चांदवड येथील दोघांपर्यंत पोहोचले आहेत. येथे बनावट नोटांची पंधरा दिवसांत ही दुसरी कारवाई असून, यामुळे नागरिकांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा घेण्यासंदर्भात भीती निर्माण होत आहे. येथे झालेल्या दुसऱ्या कारवाईत वर्धाचे कनेक्शन आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.