Charholi Crime News : वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावून व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी, चौथा आरोपी अटकेत
esakal November 16, 2025 07:45 PM

पिंपरी : चऱ्होली येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या खून आर्थिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या चार झाली आहे. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

आकाश सोमनाथ पठारे (वय २३, रा. चऱ्होली) असे चौथ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याआधी मुख्य आरोपी अमित जीवन पठारे, विक्रांत सुरेश ठाकूर, सुमीत फुलचंद पटेल यांना अटक केली आहे. बुधवारी (ता. १२) सायंकाळी गिलबिले हे मित्रांसह खडीमशीन रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी त्यांचे मित्र पठारे आणि ठाकूर हे दोघे मोटारीतून तेथे आले. त्यांनी गिलबिले यांना मोटारीत बसवले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.

यात गिलबिले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी पठारे, ठाकूर, पटेल यांना ताब्यात घेतले. चौकशीत आकाशही गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. पटेल हा वेळी गोळीबारापूर्वी व नंतरही दोन दिवस आरोपींबरोबरच होता. आकाशने पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींना मदत केली.

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे घात

पठारे याचा १२ नोव्हेंबरला वाढदिवस होता. तो मोटारीच्या चालकाच्या सीटवर बसला होता. ठाकूर व गिलबिले मोटारीच्या बाहेर उभे होते. आज पठारेचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा दे, तो गाडीत आहे, असे ठाकूरने गिलबिले यांना सांगितले. त्यानंतर गिलबिले चालकाच्या सीटपाशी गेले.

पठारेने त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह केला. त्यामुळे गिलबिले दुसऱ्या बाजूने येऊन समोर बसले. ते बेसावध असतानाच पठारेने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गिलबिले गाडीत पडले. गाडीच्या बाहेर असलेल्या ठाकूरने त्यांना जखमी अवस्थेत मोटारीतून बाहेर खेचले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.