PCMC Election : ...तर शिवसेना स्वबळावर लढणार : खासदार श्रीरंग बारणे
esakal November 16, 2025 07:45 PM

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची मागील प्रत्येक निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली. भाजपशी युतीबाबत चर्चा झाली नाही तर शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढवेल. येत्या काही दिवसांत हे ठरेल. ३२ प्रभागांत स्वबळावर उतरण्यासाठी १२८ उमेदवार देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, अशी घोषणा शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत केली.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील एका हॉटेलमध्ये शिवसेनेने पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा घेतला. उद्घाटनप्रसंगी खासदार बारणे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना युतीबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. त्यातून महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानंतर आम्ही निवडणुकीची दिशा ठरवू. मात्र, युती करून लढायचे ठरल्यास भाजपला शिवसेनेचे पहिले प्राधान्य असेल.’’

Satara Crime: सातारा हादरल! तीन वेगवेगळ्या ठिकाणी जीवन संपवण्याच्या घटना

त्यांनी सांगितले, ‘आगामी निवडणुकीत लोकांसमोर जाताना शिवसेनेने केलेल्या विकासकामांची आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनाबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती मांडू. शहरातील वाहतूक कोंडीसंदर्भात अनेक वेळा प्रशासनाला निवेदने दिली. पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, रेल्वे सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यातून झालेली प्रगतीही आम्ही मांडू.’

यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, उपनेते इरफान सय्यद, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत बारणे, पिंपरी चिंचवड महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख नीलेश तरस, शहर संघटिका सरिता साने आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांना मेळाव्यात निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. संघटन मजबूत कसे करावे, पक्षांतर्गत निवडणूक यंत्रणा प्रभावीपणे कशी राबवायची, भाषणकौशल्य आत्मसात करण्याच्या पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.