आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत इंडिया ए टीमने दणक्यात सुरुवात केली. युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने यूएईचा 140 पेक्षा अधिक धावांनी धुव्वा उडवला. भारताने यासह या स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यानंतर इंडिया ए टीमला रविवारी 16 नोव्हेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करुन सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र पाकिस्तानने भारतावर मात केली. पाकिस्तानने यासह या स्पर्धेतील आपला दुसरा विजय साकारला. पाकिस्तानने या विजयासह ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं. पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक दिली.
पाकिस्तान बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. आता भारताला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. अशात पाकिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर कॅप्टन जितेश शर्मा प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारताची या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? हे जाणून घेऊयात.
प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशी या जोडीनेच पहिल्या दोन्ही सामन्यात ओपनिंग केली. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात ओपनिंग जोडीत बदल होण्याची शक्यता कमी आहे. वैभवने यूएई विरुद्ध 144 तर पाकिस्तान विरुद्ध 45 धावा केल्या होत्या. नमन धीर वनडाऊन अर्थात तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. नमन धीर याने पाकिस्तान विरुद्ध 35 धावांचं योगदान दिलं होतं.
कॅप्टन जितेश शर्मा चौथ्या स्थानी खेळताना दिसू शकतो. जितेश शर्मात सामना फिरवण्याची क्षमता आहे. जितेशने आयपीएल स्पर्धेत निर्णायक क्षणी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे जितेशवर जबाबदारी असणार आहे. नेहल वढेरा याला सहाव्या स्थानी बॅटिंगची संधी मिळू शकते. आशुतोष शर्मा छाप सोडण्यात अपयशी ठरलाय. मात्र त्यानंतरही त्याला संधी दिली जाऊ शकते.
रमनदीप सिंह बॉलिंगने पहिल्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना त्रास देण्यात अपयशी ठरला. तसेच बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे रमनदीप सिंह याच्या जागी मुंबईकर सूर्यांश शेडगे याला संधी दिली जाऊ शकते. तसेच सुयश शर्मा, यश ठाकुर, हर्ष दुबे आणि गुरजनपीत सिंह या चौकडीवर गोलंदाजीची धुरा असणार आहे.
टीम इंडिया ए ची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कप्तान), वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, नमन धीर, नेहल वढेरा, गुरजपनीत सिंह, हर्ष दुबे, सुयश शर्मा आशुतोष शर्मा, सूर्यांश शेडगे आणि यश ठाकुर.