आरोग्य केंद्रालाच उपचारांची गरज
esakal November 18, 2025 03:45 AM

शिर्सुफळ, ता, १७ : सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना उपचाराची कोणतीही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना उपचार देणाऱ्या आरोग्य केंद्रालाच आता उपचाराची गरज असल्याचे नागरिक बोलत आहेत.
आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात अस्वच्छता पसरली असून, गवत, पाला- पाचोळ्यांच्या कचऱ्याचे ढीग, उपचाराच्या खोलीतील सांडलेल्या औषधांची अस्वच्छता यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय होत असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला जात असताना आरोग्यसेवा देणारे केंद्रच आता आजारांना निमंत्रण देणारे केंद्र बनले आहे.
स्थानिक रुग्णांसह ऊसतोड कामगार उपचारासाठी उपकेंद्रात गेले असता अनेकदा आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्राला टाळे लागलेले असते. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याबद्दल आणि अस्वच्छतेविषयी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे जात असून अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

मागील दोन वर्षापासून या केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय व अस्वच्छतेविषयी संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी पत्रव्यवहार करून अनेकदा तक्रार केली तरीदेखील वरिष्ठांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.
- संतोष सोनवणे, सरपंच, सिद्धेश्वर निंबोडी

सरपंच यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. ते स्वतः गावकऱ्यांसमोर विनाकारण चुकीच्या पद्धतीने बोलून आम्हाला त्रास देत आहेत. सततच्या पावसामुळे परिसरातील गवत वाढले होते. केंद्रातील परिचर प्रसूती अर्धवेळ रजेवर असल्यामुळे गावातील मजूर लावून स्वच्छता करून घेत आहोत. गावातील रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी नियमित केंद्रात उपस्थित राहत असतो. आणि ऑनलाइन फेस रीडिंगद्वारे हजेरी लावत असतो.
- रूपाली बंडगर, समुदाय आरोग्य अधिकारी, सिद्धेश्वर निंबोडी

08709

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.