शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप, बड्या नेत्यानं उद्धव ठाकरेंची सोडली साथ, उद्या भाजपात मोठा पक्षप्रवेश
Tv9 Marathi November 18, 2025 03:45 AM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच आता शिवसेना ठाकरे गटला मोठा धक्का बसला आहे, आणखी एक मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची वाट धरली. हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

दरम्यान आता नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे, ते आता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात अद्वय हिरे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अद्वय हिरे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती, दरम्यान आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना हिरे यांच्याकडूनच अधिकृत दुजोरा मिळाला आहे.  अद्वय हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना विधानसभा निवडणुकीत कडवे आव्हान दिले होते. ही लढत मोठी रंगतदार ठरली होती. अद्वय हिरे यांच्या प्रवेशाने आता नाशिक जिल्ह्यात  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे यांच्याबरोबरच अद्वय हिरे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याने ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

दरम्यान येत्या दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. हिरे हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आता जिल्हयात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.