प्रचाराचा धुरळा उडणार
esakal November 18, 2025 03:45 AM

प्रचाराचा धुरळा उडणार
ऐन थंडीत अंबरनाथ, बदलापूरचे वातावरण तापणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे सोमवारी (ता. १७) अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या प्रभागातून किती शिलेदार लढत देणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर अवघ्या १० दिवसांनी मतदान असल्याने प्रचारासाठी केवळ आठ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे आठवडाभर या दान्ही शहरांमध्ये ताई माई अक्काचा नारा देत प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळपर्यंत अवघे २७ तर बदलापूरमध्ये ८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या दोन्ही ठिकाणी भाजपने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. तर सोमवारी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अंबरनाथमधून अर्ज भरले. दुसरीकडे बदलापूरमध्येही शिवसेना शिंदे गट, ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांनी अपक्ष नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

दोन्ही नगर परिषदांसाठी महायुती होणार नाही याचे संकेत मिळत होते, तरीही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची सबब देत इच्छुकांना सबुरीचा सल्ला दिला जात होता. अखेर दोन्ही नगर परिषदांसाठी महायुतीत तिढा कायम राहिल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी एकसंघ राहील याची अपेक्षाही भंग पावली आहे. बदलापुरात महाविकास आघाडी फुटली आहे. याचा प्रत्यक्ष लाभ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मिळणार आहे. पण या सर्व फिसकटलेल्या गणितामुळे प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांची गर्दी वाढणार आहे.

रंगत वाढणार
महाविकास आघाडी आणि महायुती झाली असती तर निवडणूक थेट झाली असती. मात्र राजकीय गणिते जुळली नसल्याने आता प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरा जाऊन आपली ताकद अजमावत आहे. त्यामुळे निवडणुुकीची रंगत वाढणार आहे. केवळ नगरसेवक निवडून आणणे नव्हे तर आपल्या पक्षाचा नगराध्यक्षही निवडून आणण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे उद्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके किती शिलेदार रिंगणात राहतात, यावर पुढील प्रचाराचे गणित ठरणार आहे.

घरोघरी गाठीभेटी वाढणार
निवडणुकीचा माहोल तयार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या अंबरनाथ, बदलापूरमध्ये फेऱ्या वाढल्या होत्या. एकीकडे माजी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे आपले मतभेद विसरून एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅ. आशीष दामले यांचीही त्यांना साथ मिळाली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही निवडणूक मनावर घेतली असून, विजय मिळवण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये चुसर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सभांचा धडका लागणार आहे. पण त्यासोबतच घरोघरी गाठीभेटीही वाढणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.