Stock Market Crash Prediction: काहीतरी वाईट घडणार;शेअर बाजाराबाबत तज्ञांचे गंभीर संकेत! नुकसान टाळण्यासाठी सुचविले हे पर्याय!
esakal November 18, 2025 03:45 AM

Aswath Damodaran Prediction : जगभरातील शेअर बाजारात सध्या धोक्याची घंटा वाजत असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात झालेली झपाट्याने वाढ आता ‘फुगा’ बनला असून, हा फुगा कधीही फुटू शकतो, असे जगभरातील तज्ञांचे मत आहे. यातच आता वॉल स्ट्रीटमधील नामांकित व्हॅल्युएशन तज्ञ अश्वत दामोदरन यांनीही याबाबत गंभीर चेतावणी दिली आहे.

काहीतरी मोठं वाईट घडणार!

"सध्याची स्थिती बघता काहीतरी वाईट घडणार आहे. कारण एआय बबल फुटण्याची शक्यता वाढत आहे आणि त्यामुळे शेअर बाजार सुरक्षित राहणार नसल्याचा" दावा दामोदरन यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना केला. त्यांच्या गुंतवणुकीच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच ते 'संभाव्य विनाशकारी बाजार' यासाठी तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सोने आणि रोख रक्कम हे सध्या सुरक्षित पर्याय त्यांनी सुचविले आहेत.

जुनी गुंतवणूक पद्धत कालबाह्य

"आजच्या काळात सर्व मालमत्ता एकमेकांशी इतक्या जोडलेल्या आहेत की, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवण्याचा (Diversification) जुना नियम आता तितका प्रभावी राहिलेला नाही. त्यांच्या मते, पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग आणि इंडेक्स फंड्स यांचा जास्त वापर झाल्यामुळे सगळेच बाजाराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे बाजार कोसळला तर जवळजवळ सर्वच मालमत्तांवर परिणाम होईल" असे मत दामोदरन यांनी व्यक्त केल.


शेअर्स आणि बाँड्स आता सुरक्षित पर्याय नाहीत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली विचारसरणी पूर्णपणे बदलण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणतात.

  बाजार 30–35% घसरण्याची शक्यता

“सामान्य गुंतवणूकदारांनी आपले गुंतवणुकीचे धोरण पुन्हा एकदा नीट तपासावे" असा इशारा दामोदरन दिला आहे. कारण, बाजारात अचानक 30 ते 35% मोठी घसरण येऊ शकते किंवा बाजार हळूहळू अनेक वर्षे कोसळत राहू शकतो. या दोन्ही परिस्थितींमध्ये गुंतवणूकदारांना सतत नुकसान सहन करावे लागू शकते.

भीतीमुळे माझ्या गुंतवणूक धोरणात बदल

डेटा-आधारित गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेले दामोदरन यांनी स्वतःच्या विचारसरणीतही बदल केला आहे. त्यांच्या मते, “आयुष्यात पहिल्यांदाच मी माझा पैसा रोख रक्कम, संग्रहणीय मालमत्ता (collectibles assets) आणि सोने-सिल्व्हरसारख्या फिजिकल ॲसेट्समध्ये ठेवण्याचा विचार करत आहे.”

यापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत होत. कारण सोन तेवढा परतावा देत नाही.पण, यावेळी “हा निर्णय मी आर्थिक फायद्यासाठी नाही, तर भीतीमुळे घेतला" असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.