‘ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या’.. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी हा शेर, ही म्हण ऐकली असेल. आयुष्यात स्वत:ला एवढं काबील, बुलंद करा की तुमचं नशीब लिहीण्य़ापूर्वी परमेश्वराने तुम्हालाच येऊन विचारावा, बाबा रे सांग तुझी इच्छा काय आहे .. म्हणायला अगदी गूढ पण खऱ्या आयुष्यात अगदी गहन अर्थ असलेला हा शेर ज्याला समजला तो तरला. आपल्या स्वत:च्या बळावर असं काही करावं की जगाला हेवा वाटावा. साधं , सोपं आयुष्य जगणारा, सामान्यांहून सामान्य दिसणारा गावाकडचा, बारामतीमधील मोढवे गावचा एक मुलगा बिग बॉस मराठीमध्ये येतो काय, आपल्या अंदाजाने सहकाऱ्यांचं आणि प्रेक्षकाचं मन जिंकतो काय आणि बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनचा विजेता बनतो काय..
सूरज चव्हाणी ही कहाणी तुम्हा , आमाहा सर्वांना भारावून टाकणारी असली तरी त्याने त्यासाठी तितकीच मेहनतही घेतली आहे. आधी हातात काहीच नसलेला, घरही नसलेला सुरज आता गावा-गावात, घराघरात गाजतोय, एकेक स्वप्न पूर्ण करत यशाच्या शिखराकडे त्याची वाटचाल सुरू झाली आहे. रिल्स काढत असतानाच त्य़ाला बिग बॉस मराठीची संधी मिळाली आणि बाकी सर्व इतिहास सर्वांनाच माहीत आहे.
स्वप्नपूर्ती झाली… घर बांधून तयार, गृहप्रवेशही केला
याच सूरजने त्याचं घरं बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी त्याने मेहनतही केली आणि अखेर बिग बॉस जिंकल्यानंतर साधारण वर्षभराने त्याचं घर बांधून पूर्ण झालं असून स्वप्नपूर्तीही झाली आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या सूरजने आज सकाळीच त्याच्या नव्या आलिशान घराचा, तिथल्या गृहप्रवेशाचा संपूर्ण व्हिडीओ अकाऊंटवर शेअर केला आणि बघता बघता त्यावर लोकांच्या कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव झाला ना राव. सूरजचे चाहते, इतर सेलिब्रिटी यांनी तर त्याला शुभेच्छा दिल्याच. पण या सर्वांमध्ये एक कमेंट अतिशय खास होती…
अजित पवारांनी सूरजला दिल्या शुभेच्छा..
ती कमेंट होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अजित पवार यांची. सूरजने शेअर केलेला गृहप्रवेशाचा व्हिडीओ पाहून अजित पवार यांनी स्वत: त्यावर खास कमेंट केली. ‘सुरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!’
असं म्हणत अजित दादांनी त्याला शुभेच्छा दिल्या, त्या सूरजसाठी अतिशय खास ठरल्या असतील हे नक्कीच !
अजित पवारांनी केली होती घोषणा
त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सूरज चव्हाण हा अजित पवारांना भेटायला गेला होता. तोही बारामतीमधलाच असल्याने त्यांची ही भेट अतिशय खास ठरली होती. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार देखील करण्यात आला. अजित पवार आणि सूरज यांच्या गप्पा झाल्या, तेव्हा बोलता बोलता अजित दादांना समजलं की सूरजकडे रहायला घर नाही. बिग बॉसच्या घरात असताना सूरज याबद्दल अनेकदा बोललाही होता.
याबद्दल कळल्यानंतर अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली. सूरज याला एकदम चांगलं घर बांधून देणार असं त्यांनी जाहीर केलं. मी तुला घर बांधून देईन असं स्वत: अजित पवार यांनी त्याला म्हटलं. त्यांच्या या विधानाने सर्वांचंच मन जिंकलं. आण आता वर्षभराने हे वचन पूर्ण झालं असून अतिशय आलिशान असं, सुखसोयींनी सज्ज असं सूरजचं राहतं घर तयार झालं. त्यामुळेच त्या व्हिडीओवर दादांची आलेली ही कमेंटही सूरजसाठी त्या घराइतकीच खास असेल हे निश्चितच !