Rising Star Asia Cup: पाकिस्तानने फक्त 32 चेंडूत केला खेळ खल्लास, गोलंदाजांनी पाजलं पराभवाचं पाणी
GH News November 18, 2025 11:16 PM

रायझिंग स्टार आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान संघाने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. ओमान आणि भारताला पराभूत केल्यानंतर साखळी फेरीतील अंतिम सामन्यात युएईला देखील पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात पाकिस्तान गोलंदाजांनी कहर केला. युएईच्या फलंदाजांना आक्रमक माऱ्यासमोर टिकताच आलं नाही. युएई संघाचे दोनच फलंदाज फक्त दुहेरी आकडा गाठू शकले. इतकंच काय तर युएईने दिलेले टार्गेटही पाकिस्तानने फक्त 32 चेंडूत पूर्ण केलं. खरं तर पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामना औपचारीक होता. पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली होती. तर युएईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. असं असताना या स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी युएईचा संघ मैदानात उतरला होता. पण येथेही पराभवाच्या कटू आठवणी घेऊनच जावं लागलं.

युएईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर युएई संघाचा काही निभाव लागला नाही. पाकिस्तानी गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून विकेट घेण्याची सुरुवात केली. युएईच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. युएईचा संपूर्ण संघ 18 षटकात फक्त 59 धावा करून बाद झाला. युएईकडून सय्यद हैदरने सर्वाधिका 20 धावा केल्या. तर मोहम्मद फराझुद्दीनने 12 धावांचा दुहेरी आकडा गाठला. या व्यतिरिक्त इतर फलंदाज एकेरी आकड्यावरच राहिले.

पाकिस्तानकडून सुफियान मुकीने सर्वाधिक विकेट काढले. त्याने 4 षटकात 12 धावा देत 3 जणांना बाद केलं. तर अहमद दानियालने 3 षटकात 7 धावा देत दोन गडी बाद केले. माज सदाकतने 2, शाहिद अजीज 1 , अराफत मिन्हास 1 आणि मुहम्मद शहजादने 1 विकेट काढली. पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त 60 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान 1 गडी गमवून 32 चेंडूत पूर्ण केलं. पॉवर प्लेमध्येच युएईचा खेळ खल्लास झाला. माज सदाकतने 15 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार होते., तर गाजी घोरीने 12 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या.

भारताचा शेवटचा सामना ओमानशी होत आहे. या सामन्यात विजयी संघ उपांत्य फेरीत जागा मिळवणार आहे. भारताने उपांत्य फेरीत जागा मिळवली आणि सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना होऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.