पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट टीमने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. श्रीलंकेला पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने श्रीलंकेचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता 18 नोव्हेंबरपासून टी 20i ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेत यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात एकूण 7 सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे.
ट्राय सीरिजआधी श्रीलंका क्रिकेट टीमच्या 2 खेळाडूंनी आधीच पाकिस्तान सोडलं आहे. या 2 खेळाडूंना तब्येत ठीक नसल्याने मायदेशी परतावं लागलं. त्यामुळे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झालेली. त्यात आता आणखी भर पडली आहे. श्रीलंकेचा अनुभवी मॅचविनर ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याला दुखापत झाली आहे. त्यामुळे हसरंगा याला पहिल्या सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने खबरदारी म्हणून ट्राय सीरिजसाठी विजयकांत व्यासकांत याचा संघात समावेश केला आहे. विजयकांत फिरकीपटू आहे.
हसरंगा टी 20i मालिकेतून बाहेर झालेला नाही. मात्र ऐन वेळेस धावपळ टाळण्यासाठी टीम मॅनजमेंटने विजयकांत याला हसंरगाचा बॅकअप म्हणून संधी दिली आहे. विजयकांत सध्या एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत खेळत होता. त्यानंतर विजयकांत या टी 20 ट्राय सीरिजसाठी थेट दोहा इथून पाकिस्तानला येणार आहे. विजयकांत याला श्रीलंकेकडून एकच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. विजयकांतने ऑक्टोबर 2023 साली एशियन गेम्स स्पर्धेतून पदार्पण केलं होतं.
चरित असलंका हा श्रीलंकेचा नियमित टी 20i कर्णधार आहे. मात्र चरितला दुखापतीमुळे मायदेशी परतावं लागलं. त्यामुळे आता दासुन शनाका श्रीलंकेचं टी 20i ट्राय सीरिजमध्ये नेतृत्व करणार आहे.
दरम्यान श्रीलंका या टी 20i ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान आणि झिंबाब्वे या 2 संघांविरुद्ध प्रत्येकी 2 असे एकूण 4 सामने खेळणार आहे. श्रीलंकेचा या मालिकेतील पहिला क्रिकेट सामना हा झिंबाब्वे विरुद्ध होणार आहे. हा सामना 20 नोव्हेंबरला होणार आहे.
श्रीलंकेचा सुधारित संघ : दासुन शनाका (कर्णधार) पाथुम निसांका, कामिल मिशारा, कामिंदु मेंडीस, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानगे, विजयकांत व्यासकांत, कुसल मेंडीस, कुसल परेरा, महीश तीक्षना, दुशान हेमंथा, पवन रतनायके, नुवान तुषारा, ईशान मलिंगा आणि दुष्मंथा चमीरा.