अभिषेक शर्मा टीम इंडियातील व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या खेळीमुळे विरोधकांच्या हातातला सामना कधी निघून जातो तेच कळत नाही. अशीच काहीशी खेळी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी करत आहे. रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकलं. त्यामुळे त्याची लवकरच टीम इंडियात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी ओपन करताना नक्की कधी पाहायला मिळेल? असा प्रश्न विचारला जात आहे. पण क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री झाल्यानंतरच मिळेल. पण टीम इंडियात त्याची वर्णी कधी लागेल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर टीव्ही 9 मीडियाने वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मनीष ओझा यांनी सांगितलं की, वैभव सूर्यवंशी सध्यातरी टीम इंडिया ए कडून खेळत आहे. ही भारताची दुसरी वरिष्ठ टीम आहे. इंडिया ए साठी रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याला टीम इंडियाची दारं खुली होतील. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करणं भाग आहे. पण त्यासह त्याला अंडर 19 वर्ल्डकप आणि आयपीएलच्या पुढच्या पर्वात चांगली कामगिरी करावी लागेल. या तीन ठिकाणी वैभव सूर्यवंशीने चांगली कामगिरी केली तर त्याला टीम इंडियात स्थान मिळेल. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी पाहता येईल.
वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्धच्या सामन्यात 42 चेंडूत 144 धावा केल्या होत्या. यात त्याने 15 षटकार मारले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने 161 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या होत्या. या सामन्यातही टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरुद्ध होत आहे. या सामन्यात चांगली कामगिरी केली तर त्याला निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यातील विजयावर टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार आहे.