नाशिक: अभूतपूर्व गोंधळ व विलंबानंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी (बी. फार्मसी) प्रवेशाची प्रक्रिया सोमवारी (ता. १७) पूर्ण झाली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल १५ हजार ९३६ जागा रिक्त राहिल्या आहेत. उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याचा फटका प्रवेशांवर बसल्याचे यातून स्पष्ट होते.
बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र शाखेतून पदवी शिक्षणाचा पर्याय खुला होता. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी ग्रुप) या विषयांची परीक्षा घेतली होती.
सीईटी परीक्षेचा निकाल लागून प्रदीर्घ काळ उलटूनही फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या गलथान कारभारामुळे प्रवेशप्रक्रिया रेंगाळली होती. ७ जुलैपासून बी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली होती. २ सप्टेंबरपर्यंत केवळ नोंदणीचा सोपस्कार झाला. त्यानंतर प्रवेशाच्या नियमित फेऱ्या व संस्थात्मक पातळीवरील जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतरही राज्यस्तरावर १५ हजार ९३६ जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
राज्यस्तरावरील स्थिती अशी
व्यवस्थापन कोट्यातील जागा- २,५२८
पहिल्या प्रवेशफेरीतील प्रवेश- १६,४१३
दुसऱ्या प्रवेशफेरीतील प्रवेश- ७,९३२
तिसऱ्या प्रवेशफेरीतील प्रवेश- ३,४६०
चौथ्या प्रवेशफेरीतील प्रवेश- १,९९६
ए-कॅप फेरीत झालेले प्रवेश- १,८९५
व्यवस्थापन कोट्यातील जागांवर प्रवेश- १,२४६
Ratnagiri News:'रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत रंगत येणार'; इच्छुकांची संख्या वाढल्याने अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणारएम.फार्मसीच्या ८१५ जागा रिक्त
पदवीप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.फार्मसी) जागांवर उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली होती. या अभ्यासक्रमाच्या राज्यस्तरावर ८१५ जागा रिक्त राहिल्या आहेत. एम.फार्मसीसाठी २२९ महाविद्यालयांमध्ये प्रवेशफेऱ्यांच्या माध्यमातून एकूण आठ हजार ६२४ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या फेरीत एक हजार ७१२, दुसऱ्यात एक हजार ४६१, तिसऱ्यात ९६३, चौथ्या फेरीत दोन हजार ८२८, ए-कॅपमध्ये एक हजार ०५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. व्यवस्थापन कोट्याच्या ७३२ जागांपैकी ५२६ जागांवर प्रवेश झालेले आहेत.