Mukesh Ambani : 31,000 कोटींच्या बाजारात मुकेश अंबानी करणार गुंतवणूक! दोन वर्षात बाजार होणार दुप्पट!
esakal November 18, 2025 09:45 PM

Reliance Company: रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील पेट अॅनिमल केअरचा (पाळीव प्राण्यांच्या देखभाल) बाजार 2028 पर्यंत दुप्पट वाढून तब्बल 7 अब्ज डॉलर्सपर्यंत (सुमारे 62 हजार कोटी रुपये) जाईल. सध्या हा बाजार अंदाजे 3.5 अब्ज डॉलर्स (31 हजार कोटी रुपये) आहे.

रिलायन्सची पेट फूड मार्केटमध्ये एंट्री

रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) आता भारतातील वेगाने वाढणाऱ्या पेट अॅनिमल फूड मार्केटमध्ये उतरते आहे. रिलायन्स "Vaggies" या ब्रँडअंतर्गत उत्पादने बाजारात आणणार असून, ही उत्पादने नेस्ले, मार्स, गोदरेज कंझ्युमर, इमामी यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या तुलनेत 20% ते 50% कमी किंमतीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कोणत्या शहरांवर असणार लक्ष?

रिलायन्स रिटेलची ही स्ट्रेटेजी मुख्यतः जनरल आणि टियर-2 शहरांतील दुकाने यांवर केंद्रित असेल. RCPL ने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, कंपनी पेट फूड मार्केटमधील मोठ्या ब्रँड्सला थेट टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

2027 पर्यंत संपूर्ण देशभरात उपलब्ध होणार उत्पादने

रिलायन्स आपल्या सर्व प्रॉडक्ट कॅटेगरी जसे की कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, पाणी आणि स्टेपल फूड्स आपल्या स्पर्धकांपेक्षा 20–40% कमी दरात विकते. त्यामुळे अनेक कंपन्यांना आपली मार्केटिंग स्ट्रेटेजी बदलावी लागते.

या वर्षी जून महिन्यात दिलेल्या मुलाखतीत RCPL चे डायरेक्टर टी. कृष्णकुमार यांनी मार्च 2027 पर्यंत कंपनीचे सर्व उत्पादने देशपातळीवर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले होते. आमची कंपनी 60 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर आणि ग्राहकांच्या आजूबाजूला असणाऱ्या स्टोअर्ससोबत मजबूत नेटवर्क बांधण्यावर लक्ष केंद्रीत असल्याचेही कृष्णकुमार म्हणाले होते.

भारतात पेट केअर मार्केटची प्रचंड वाढ

सध्या देशातील पेट फूड मार्केटचे मूल्य 31 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते. रेडसीरच्या अहवालानुसार, यात दुप्पट वाढ होणार आहे. दुप्पट वाढ होण्यामागची कारण म्हणजे प्रीमियम प्रॉडक्ट्सची वाढती मागणी आणि सब्स्क्रिप्शन मॉडेल्सचा वापर.

सध्या बाजारात मोठ्या ब्रँड्समध्ये पेडिग्री, पुरीना, सुपरटेल्स आणि रॉयल कॅनिन यांचा समावेश आहे, तर प्रमुख स्टार्टअप्समध्ये हेड्स अप फॉर टेल्स आणि ड्रूल्स यांचा समावेश होतो. रिलायन्सच्या बाजार प्रवेशाने या कंपन्यांच्या बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.