डी-मार्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खूप मोठा डिस्काऊंट. आपल्याला किराणा, तेल आणि साबणापासून ते बिस्किटांपर्यंत सगळे काही डी-मार्टमध्ये स्वस्त दरात मिळते. सध्या राज्यभरात डी-मार्टचे जाळं पसरलं आहे.
राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील डी-मार्टने भारतीय रिटेल क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. डी-मार्टच्या अभूतपूर्व यशामागे आणि त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमागे मोठे गुपित आहे.
डी-मार्टचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ‘रिअल इस्टेट मॉडेल’. डी-मार्ट कधीही नवीन स्टोअर उघडताना भाड्याची जागा घेत नाही, ते स्वतःची जमीन खरेदी करतात किंवा इमारत बांधतात.
यामुळे भाड्याचा प्रचंड खर्च पूर्णपणे वाचतो. साधारणपणे ५ ते ७ टक्के झालेली ही बचत डी-मार्ट ग्राहकांना डिस्काउंटच्या रूपात परत करते. यामुळेच डी-मार्टमध्ये प्रत्येक वस्तूवर स्वस्त किंमत मिळते.
स्वस्त दरांमागे डी-मार्टचे दुसरे गुपित म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट. डी-मार्ट आपले बहुतांश स्टॉक साधारणपणे ३० दिवसांत पूर्णपणे क्लिअर करते. स्टॉकची विक्री लवकर झाल्याने आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे डी-मार्ट उत्पादक कंपन्यांना लवकर पैसे देते.
लवकर पेमेंटच्या बदल्यात उत्पादक कंपन्या डी-मार्टला जास्त सवलत देतात. उत्पादकांकडून मिळालेली ही सवलतसुद्धा डी-मार्ट स्वस्त वस्तूंच्या रूपात ग्राहकांना परत देते. यामुळे किराणा, साबण, तेल, बिस्किटं यांसारख्या दैनंदिन वस्तू अत्यंत कमी दरात उपलब्ध होतात//
डी-मार्ट मध्यस्थ टाळून थेट उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात सामान विकत घेते. यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो. तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने डी-मार्टला ‘bulk discount’ मिळतो.
डी-मार्ट स्टोअरची रचना साधी असते, ज्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादने ठेवता येतात. यामुळे व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी असतो. डी-मार्ट अनेक प्रायव्हेट लेबल्स तयार करते, जे मूळ ब्रँडपेक्षा स्वस्त दरात विकले जातात.
दरम्यान राधाकिशन दमानी यांनी १९९९ मध्ये नेरुळमध्ये घेतलेली डी-मार्टची पहिली फ्रँचायसी सुरु केली. पण ती अपयशी ठरली. परंतु, त्यांनी हार न मानता २००२ मध्ये मुंबईत पहिले डी-मार्ट स्टोअर उघडले. आता त्यांचे राज्यात ३०० हून अधिक स्टोअर्स आहेत.