पिंपरी, ता. १८ ः प्रवासादरम्यान एक प्रवासी बॅग एसटी बसमध्ये विसरला. सुरक्षारक्षक सुरक्षा रक्षक अनिल शिंदे व तुषार कोळी यांनी ती बॅग परत केली. यात महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि दोन तोळ्याची सोनसाखळी होती. बॅग परत मिळाल्याने प्रवाशाने एसटी प्रशासनाचे आणि सुरक्षा रक्षकांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची चिपळून ते पिंपरी चिंचवड बस शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वल्लभनगर आगारात पोहोचली. रात्री उशीर झाल्याने बसमधील प्रत्येकाची साहित्य घेऊन उतरण्याची लगबग सुरू होती. काही वेळातच पूर्ण बस रिकामी झाली. मात्र, शेवटचा प्रवासी उतरत असताना त्याला बसमध्ये एक बेवारस बॅग आढळून आली. बॅगेत काही संशयास्पद वस्तू असण्याच्या भीतीने त्याने बॅगेला हात न लावता आगारातील सुरक्षा रक्षक शिंदे व कोळी यांना माहिती दिली. दोन्ही सुरक्षा रक्षकांनी बसमध्ये येऊन मोठ्या धाडसाने ती बॅग ताब्यात घेऊन उघडली. तर त्यात प्रवाशाचे कपडे, रोख रक्कम आणि दोन तोळ्याची सोनसाखळी दिसली. शिंदे व कोळी ही बॅग आगारात जमा करण्यासाठी घेऊन जात असतानाच मौल्यवान ऐवज हरवला असल्याने प्रवासी कैलास कुसळकर घाबरलेल्या अवस्थेतच आगारात पोहोचले. त्यावेळी त्याने चिपळून-पिंपरी चिंचवडमध्ये बॅग विसरल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकांनीही बॅग असल्याचे सांगताच प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरक्षा रक्षकांनी बॅगमधील कागदपत्रांआधारे ती बॅग प्रवासी कुसळकर यांचीच असल्याची खात्री झाल्यावर त्या प्रवाशास सुपूर्द केली.