मुंबईकरांचे हाल संपता संपेना, सीएनजी पुरवठ्याबद्दल नवीन अपडेट समोर
Tv9 Marathi November 19, 2025 03:45 PM

रविवारपासून मुंबईतील सीएनजी पुरवठ्यात झालेला बिघाड अखेर दुरुस्त करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून हा सीएनजी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, सलग दोन-तीन दिवस पुरवठा बंद राहिल्याने बॅकलॉग निर्माण झाला आहे. तसेच या दोन दिवसात कमी दाबामुळे गॅस पुरवठा होत होता. त्यानंतर आता हा बिघाड दुरुस्त झाला असला तरी बुधवारी सकाळी मुंबईकरांचे हाल सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजी पुरवठा सुरु झाल्यावर पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मात्र सीएनजीचा पुरवठा सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, आज बुधवारी सकाळी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसली. मुंबईतील मध्य आणि पूर्व उपनगरातील अनेक सीएनजी पंपांवर टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी गॅसचा दाब कमी असल्याने वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे.

तसेच टॅक्सी आणि रिक्षाचालक गॅस भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे असल्याने रस्त्यावर प्रवासी वाहनांची कमतरता जाणवत आहे. याचा थेट फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे.

नेमकं कारण काय?

या गॅस संकटाचे मूळ कारण ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ (RCF) च्या चेंबूर येथील आवारात घडलेली घटना आहे. या ठिकाणी ‘गेल’ (GAIL) च्या मुख्य गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे थर्ड-पार्टी कामामुळे मोठे नुकसान झाले होते. या पाईपलाईनमधून वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला (CGS) गॅस पुरवठा होतो, जिथून पुढे ‘महानगर गॅस लिमिटेड’ (MGL) मुंबई शहरात गॅस वितरीत करते.

मात्र मुख्य वाहिनीलाच धक्का बसल्याने वडाळा CGS मधून होणारा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. ज्यामुळे दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील सेवेवर मोठा परिणाम झाला. संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून पाईपलाईनची दुरुस्ती केली आहे आणि गॅस पुरवठा सुरू केला आहे. मात्र, पाईपलाईनमध्ये योग्य दाबाने गॅस सर्व पंपांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गेल्या दोन दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही यंत्रणा सुरळीत होण्यासाठी आजचा पूर्ण दिवस लागू शकतो. त्यामुळे वाहनचालकांना आज दिवसभर संयम राखावा लागणार आहे. तसेच उद्या सकाळपर्यंत (गुरुवार) परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.