Imran Khan : माझे खांदे पकडून माझे पाय..पाकिस्तानात इमरान खान यांच्या बहिणीसोबत खूप वाईट घडलं
GH News November 19, 2025 04:11 PM

पाकिस्तानात इमरान खान यांच्या तीन बहिणी अलीमा, उजमा आणि नौरीन खान यांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली आहे. रावळपिंडी स्थित अदियाला तुरुंगाच्या बाहेर हे सर्व घडलं. रिपोर्टनुसार इमरान खान यांची बहिण नौरीनला ताब्यात घेण्यापूर्वी रस्त्यावर फरफटवलं. एका व्हिडिओमध्ये इमरान यांच्या बहिणी थरथर कापत असून घाबरलेल्या दिसत आहेत. इमरान खान यांच्या तीन बहिणी त्यांना भेटण्यासाठी अदियाला तुरुंगात गेल्या होत्या. इमरान खान अदियाला तुरुंगात एकांतात शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तान प्रशासनाने इमरान यांना भेटण्यापासून त्यांच्या तीन बहि‍णींना रोखलं. “मी तिथे उभी होती. पोलीसवाले आले आणि मला पकडून जमिनीवर फेकलं. मला समजलं नाही. एक जाडी पोलिसवाली होती. मला वाटतं ती याच कामासाठी आली होती. माझे खांदे पकडले, पायाला पकडून मला फरफटत नेलं. या पातळीपर्यंत ते खाली घसरु शकतात. हे खेदजनक आहे. पंजाब पोलीस क्रूर आहेत” असं नौरीन खान म्हणाल्या.

पोलिसांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहिणींसोबत रावळपिंडीच्या अदियाला जेलबाहेर गैरवर्तन केलं. त्यांना हिंसक पद्धतीने ताब्यात घेतलं असं इमरान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ पक्षाने म्हटलं आहे. इमरान यांना भेटण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून त्यांच्या बहिणी जेल बाहेर बसल्या होत्या. जेल प्रशासनाने पार्टी नेते आणि इमरान यांच्या कुटुंबाला त्यांना भेटण्याची परवानगी दिली नव्हती. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तहरीक-ए-इंसाफने पोस्ट केली. त्यात पक्षाने म्हटलय की, पोलिसांनी कारवाई केली तेव्हा अलीमा खान, नोरीन नियाज़ी आणि डॉ. उज़मा खान जेल बाहेर शांतते बसलेल्या. खैबर पख्तूनख्वाच्या स्थानिक सरकारमधील मंत्री मीना खान अफ्रिदी, एमएनए शाहिद खट्टक आणि अन्य महिलांसह पार्टी कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केली.

बोलताना कापताना दिसते

एक कैदी म्हणून इमरान खान यांच्या अधिकारानुसार त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याचा हक्क आहे. पण याचा वापर त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांविरोधात छळण्यासाठी, त्रास देण्यासाठी केला जात आहे असं पीटीआयने म्हटलं आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओत अलीमा, उजमा आणि नौरीन यांच्याभोवती गर्दी दिसते. नौरीन यावेळी बोलताना कापताना दिसते. एका व्हिडिओमध्ये नौरीन यांनी म्हटलं की, “महिला पोलीस अधिकाऱ्याने तिचे केस पकडले व जमिनीवर पाडलं. मला काही समजलं नाही. काय झालय ते अजूनही मला समजलेलं नाही. पीटीआय कार्यकर्ते जेलबाहेर शांततेत बसले होते”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.