पुणे – माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. या मंगळवारी दिवसभर या तरुणाचा संपर्क होत नव्हता त्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पुण्यातील खडकवासला–उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी काल रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.
रायगडच्या माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात काल रात्री थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळली. या थार कारमधील सहाही तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी या तरुणांचे फोन लागत नव्हते. त्यानंतर या तरुणांचा शोध सुरु झाला. या तरुणाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळल्याने ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या तरुणांचा शोध घेण्यास आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. घटनास्थळी माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली उतरून तरुणांचा शोध सुरू केला.
ताम्हिणी घाटात ही थार गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही पत्ता नव्हता. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. या थार कारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. पुण्यातील हे तरुण सोमवारी रात्री थार कारने कोकणात फिरायला निघाले होते. परंतू त्यांच्याशी मोबाईलशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या शोध सुरु करण्यात आला. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व मृत झालेले तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
मृतांचे नावे खालील प्रमाणेअपघातातील सर्व तरुण हे पुण येथील उत्तमनगर येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.