शेकोट्यांभोवती गप्पांचे फड
तापमान घटल्याने पनवेलकरांना आधार
नवीन पनवेल, ता. २० (बातमीदार) ः पनवेल परिसरात तीन-चार दिवसांत तापमान घटल्याने वाढलेल्या गारठ्याने नागरिकांना कापरे भरले आहे. रात्रीच्या वेळी तापमानात झालेली घट जाणवत गल्लोगल्ली शेकोट्यांभोवती गप्पांचे फड रंगू लागले आहेत.
रस्त्याच्या कडेला, चौकांत, सोसायट्यांच्या आवारात तरुण, कामगार तसेच ज्येष्ठ नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. काडीकचरा, लाकूडफाटा जमा करून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. चहा, कांदाभजीसारखे पदार्थासोबत गप्पा आणि शेकोटीचा रंगतदार माहोल दिसत आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यानंतर हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पनवेल पारिसरात येत्या काळात गारठा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------
विद्यार्थ्यांची चिडचिड
पनवेलमध्ये सकाळच्या वेळेला शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कडाक्याची थंडी नकोशी वाटते; मात्र भल्या पहाटे उठून रस्त्याने फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या खांदा वसाहत, नवीन पनवेल, खारघर, कळंबोलीमधील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांची गर्दी वाढली आहे.
-----------------------
गरम कपड्यांना मागणी
थंडीचा कडाका जाणवल्याने गरम कपड्यांची खरेदीही वाढली आहे. त्यामुळे पनवेलच्या बाजारपेठेत स्वेटर-मफलर विक्रेत्यांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. अचानक थंडी वाढल्याने स्वेटर, कानटोपीला अधिक मागणी आहे.