चापेकर चौक ते बिर्ला घाट परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम
esakal November 21, 2025 10:45 AM

चिंचवड, ता. २० ः चापेकर चौक ते बिर्ला घाट पुलाखाली वाढलेल्या अतिक्रमण, घाण आणि दुर्गंधीच्या तक्रारींवर अखेर महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय अतिक्रमण व आरोग्य विभागाने संयुक्त अशी सलग दोन दिवस कारवाई करून परिसर स्वच्छ करण्यास सुरवात केली आहे.
या पुलाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक शिल्प असून परिसरातील अतिक्रमणांमुळे घाण जमा झाली होती. या ठिकाणी झोपडपट्टीतील काही कुटुंबे घोड्यांच्या व्यवसायासाठी पुलाखालीच घोडे तसेच घोडागाड्या ठेवत असल्याने तीव्र दुर्गंधी पसरत होती. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिकांनी केलेल्या वारंवार तक्रारीनंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
महापालिकेने सलग दोन ते तीन दिवस (ता.१६ ते १८) या ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. तसेच चापेकर पुलापासून बिर्ला घाटापर्यंत मंडईसमोरील घोडे, घोडागाड्या आणि रथ उभे करण्यावरही बंदी घालण्यात आली.
कारवाईदरम्यान काही कुटुंबांना सावली फाउंडेशनमार्फत स्थलांतराची सूचना देण्यात आली. तरीही काही कुटुंबे सांगूनदेखील पुलाखालून जात नसल्याने महापालिकेने आगामी काळातही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
या मोहिमेत ‘ब’क्षेत्रीय कार्यालयीन अधीक्षक व प्रशासकीय अधिकारी माधुरी पंडित, बीट निरीक्षक प्रियांका तोडकरी, आरोग्य निरीक्षक संतोषी कदम तसेच अतिक्रमण विभागातील एमएसएफचे महिला कर्मचारी व जवान सहभागी झाले. कारवाईनंतर आरोग्य विभागाकडून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. चाफेकर चौक परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू राहणार असून, स्थानिक नागरिकांकडून या केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.

चापेकर चौक ते बिर्ला घाट पर्यंत पुलाखाली ‘ब’ क्षेत्रीय अतिक्रमण विभाग व आरोग्य विभाग कार्यालयाकडून संयुक्तपणे कारवाई करून अतिक्रमण हलवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.