पुणे, ता. २० ः ग. दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वस्त शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे उपस्थित होते. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, यासह विविध पुरस्कारांचे वितरण १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. यावेळी आनंद माडगूळकर लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘माझ्या खिडकीतून गदिमा’ या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार ‘नादब्रह्म’ या शास्त्रीय आणि सुगम संगीताला वाहिलेल्या संस्थेसाठी रवींद्र गांगुर्डे यांच्याबरोबर योगदान देणाऱ्या वंदना रवींद्र गांगुर्डे यांना देण्यात येणार आहे. नव्या उभारीच्या कलावंताला दिला जाणारा ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे. तसेच स्वर्गीय विद्याताई माडगूळकर आणि त्यांच्या कन्या प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ तरुण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना देण्यात येणार आहे. यावेळी गदिमांचे निस्सीम चाहते आणि गदिमांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणारे सांगली जिल्ह्यातील जत येथील निवासी डॉ. श्रीपाद जोशी यांचा यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ कवी अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांचा समावेश असलेला ‘वंद्य वंदे मातरम’ हा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानचे कलाकार सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.