खेड शिवापूर, ता. २१ : तुमच्या हॉटेलमध्ये मनोरंजन व खेळाच्या नावाखाली जुगार चालतो आहे, असे खोटे वृत्त वर्तमानपत्रात व सोशल मीडियाला देऊन तुमची बदनामी करेल, तुमच्या विरोधात नागरिकांना उपोषणाला बसवेन, अशी धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागून त्यामधील ८० हजार रुपये घेणाऱ्या खंडणीखोरावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. न्यायालयाने रासकरला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
संदीप हनुमंत रासकर (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीखोराचे नाव आहे. तर विजय दत्तात्रेय अडागळे (वय ३५ रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत संदीप रासकरने खेडशिवापूर (ता. हवेली) येथे अनिल पटाडे (रा. बोरी, ता. जुन्नर) व संतोष वागळे (रा. हडपसर, पुणे) यांच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या हॉटेल प्लाझोमध्ये चालणाऱ्या प्रतीक्षा मनोरंजन प्लेइंग कार्ड क्लब संस्थेत अवैध जुगार चालतो, असे खोटे वृत्त करून सोशल मीडिया व वर्तमानपत्रात तुमची बदनामी करीन, खोट्या तक्रारी करून नागरिकांना तुमच्या संस्थेच्या विरोधात उपोषणाला बसवेन, अशी धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. यामुळे घाबरून हॉटेल व्यवस्थापक अडागळे यांनी त्यास रोख ४० हजार रोख व ऑनलाइन ४० हजार रुपये दिले; परंतु त्यावर रासकर यांचे समाधान न होता त्याने १६ तारखेला अडागळे यांना भेटून तुम्हाला एकदम एक लाख रुपये देता येत नाही काय, अजून २० हजार बाकी आहेत, ते ताबडतोब द्या, नाहीतर मी आता तुमच्याकडे येणार नाही, पण लोकांना तुमच्या विरोधात उपोषणाला बसवणार आहे, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत निघून गेला. यावर कंटाळून अडागळे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.