स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाआधीच भाजपचे कमळ फुलले, 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड
GH News November 22, 2025 01:11 AM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख आहे. आज अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. यात भाजपच्या सर्वाधिक नगर सेवकांचा समावेश आहे. तब्बल 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध

नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले आहे. निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे हे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचा दावा केला जात आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही आकडेवारी समर आली आहे.

  • भाजपचे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – 100
  • भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – 3

कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?

  • कोकण – 4
  • उत्तर महाराष्ट्र – 49
  • पश्चिम महाराष्ट्र – 41
  • मराठवाडा – 3
  • विदर्भ – 3

दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध

धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका जिथे नगराध्यक्षसह भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं आहे.

जामनेर नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध

जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. येथील नगराध्यक्षपदी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपच्या सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध झाले होते आता 10 नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान, भाजपचे नेते निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून महायुती शानदार विजय मिळवणार असल्याचे भाकित करत आहे. अशातच आता भाजप आणि मित्रपक्षांनी मतदानापूर्वीच मोठी आघाडी घेतली असल्याचे समोर आले आहे. आता मतदानानंतर भाजपचे आणखी किती नगरसेवक निवडून येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.