फक्रुद्दिनच्या फ्रीजची गारेगार कथा
esakal November 23, 2025 05:45 PM

गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com

‘‘तुला एवढंच जर गार पाणी हवं असेल, तर ह्यातून तुझा तू मार्ग काढू शकतोस!’’ फक्रुद्दिनच्या आईने वैतागून शेवटी त्याला ताकीद दिली. भोपाळच्या तीन नंबर स्टेशनच्या तिसऱ्या गल्लीत आपल्या कुटुंबासोबत राहत असे फक्रुद्दिन. सगळेजण त्याला प्रेमाने ‘फक्रु’ म्हणत. खरं तर, त्याचं दुसरं टोपणनाव त्याला जास्त शोभायचं, ते होतं - ‘फिक्रू!’

हो! कारण फक्रुसारखी काळजी करायचा. कधी एखादी अडचण आली, तर समोर एखादा प्रश्न आला, तर त्याला जाम टेन्शन यायचं, तो खूप अस्वस्थ व्हायचा आणि एकामागे एक असे अनेक प्रश्न यायचे त्याच्या मनात! समजा जर एखाद्या वेळी वीज गेली, तर त्याला वाटायला लागायचं की, जर उजेड नसेल तर मी अभ्यास कसा करणार? बापरे!

Premium|Story: ऐरिनाच्या मेसेजने पुरूच्या मनात जागली खारकिव्हच्या दिवसांची आठवण

जर मी अभ्यास करू शकलो नाही तर मी पास कसा होणार? बापरे!

जर मी नापास झालो, तर मी काय करू? बापरे!

मग त्याची अम्मी त्याच्यासमोर एक कंदिल आणून ठेवायची, तेव्हा कुठे तो शांत व्हायचा.

समजा वर्गात फळ्यावरचं उतरवून घेता घेता वही भरली, तर फक्रु अगदी कावराबावरा व्हायचा. त्याच्या मनात यायचं, जर कागद नसतील तर मी लिहिणार कसा? बापरे!

जर मी लिहिलं नाही तर मी अभ्यास कसा करणार? बापरे! हे ऐकून त्याचा मित्र परम त्याच्या वहीतलं एक पान फाडून फक्रूला द्यायचा, तेव्हा कुठे फक्रुला बरं वाटायचं.

प्रत्येक जण फक्रुच्या या स्वभावाला जरा कंटाळलाच होता. नाही, त्याच्या काळजी वाटण्याला नाही तर त्याच्या, त्यावरचे उपाय शोधण्याचा प्रयत्नच न करण्याला. अशा या फक्रुचं त्या दिवशी काय झालं असेल ज्या दिवशी त्याच्या घरातला फ्रिज बिघडला, कल्पना करा!

फक्रु चिंतेनं घरभर पळत होता.

आपण फ्रिजशिवाय कसे राहणार? बापरे!

आपण उरलेलं अन्न कुठे ठेवणार? बापरे!!

या उकाड्यात थंड पाणी कसं मिळणार? बापरे!

आता मात्र फक्रुची अम्मी अगदी वैतागून गेली.

‘‘तुला एवढंच जर गार पाणी हवं असेल, तर यातून तुझा तू मार्ग काढू शकतोस!’’ ती म्हणाली.

फक्रुने निश्चय केला की, आता तोच यावर काही तरी उपाय शोधेल आणि तो घराबाहेर पडला. बाहेर रस्त्याच्या पलीकडे त्याला एक लिंबू सोडा विकणारा गाडा दिसला. गार गार लिंबू सोडा! पण त्यांच्याकडे कुठे फ्रिज आहे? त्याने जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्याला कळलं की, तो लिंबू-सोडा विकणारा भय्या एका पांढऱ्या खोक्यातून बर्फ काढून ग्लासात टाकतो आहे.

आयडिया!

मीसुद्धा पाणी गार ठेवण्यासाठी बर्फ वापरणार. त्या भय्यांनी सांगितलं की, या थर्माकोलच्या खोक्यात गरम गोष्टी गरम आणि गार गोष्टी गार राहतात. हे तर बेस्टच झालं! पण पुढे ते जे म्हणाले, त्याने फक्रुचा सगळा आनंद पळून गेला. रोज खोक्यात ताजा बर्फ भरावा लागतो आणि त्याची किंमत असते रोजचे दहा रुपये! एवढे पैसे फक्रुकडे नव्हते. निराश होऊन तो चालत चालत जवळच्या एका बागेत गेला आणि तिथल्या एका बाकावर बसला. तिथे त्याला काही चिमण्या मातीत लोळत असलेल्या दिसल्या.

‘अरे या चिमण्यांचा काय हा मूर्खपणा? त्या का बरं असं मातीने बरबटवून घेतायत स्वतःला?’’ त्याचं हे पुटपुटणं ऐकून त्या बाकावर बसलेल्या दादीने त्याला समजावलं की, कशा प्रकारे माती त्या चिमण्यांना कडक उन्हात गारवा देते.

काय? मातीने गार होणे? भन्नाटच की!

फक्रुचे डोळे लगेच चमकले, पण जर माती पाण्यात घातली, तर ते पाणी पिणार कसं? फक्रु नेहमीप्रमाणे कुरकुरला.

दादी हसली आणि म्हणाली, ‘‘पाण्यात माती की, मातीत पाणी?’’ थोडा विचार कर. आजूबाजूला बघ. मग मिळेलच तुला तुझं उत्तर!’’

ही साधी सुंदर गोष्ट लिहिलीय मीनू थॉमस यांनी. फक्रुच्या घरातले अनेक बारकावे टिपणारी, त्याचं विश्व उभं करणारी आणि त्याच्या स्वभावाला साजेशा त्याच्या कपाळावरच्या आठ्या असलेली चित्रे काढली आहेत तन्वी भट यांनी. या मूळ हिंदी गोष्टीचा मराठी अनुवाद सुवर्ण श्रीधर यांनी केला असून, हे पुस्तक तुलिका प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.

Premium|Liberty Bell: मी फक्त एक विधवा नाहीये याची त्यानं मला जाणीव करून दिली..

मातीत पाणी की पाणीत माती या दादीने घातलेल्या कोड्याचा विचार करत करत फक्रु घरी निघाला. अचानक त्याचे लक्ष तीन नंबर बस स्टॉपच्या जवळ असलेल्या एका पाटीकडे गेलं.

पाटीवर लिहिलं होतं -

‘पिण्याचे पाणी’ आणि शेजारीच एका मोठ्या माठात पाणी ठेवलं होतं. फक्रुने त्यातलं ग्लासभर पाणी प्यायलं. आहा! गारेगार पाणी!

अरे हो! गार पाणी! मातीच्या भांड्यात! म्हणजेच मातीत पाणी! हुर्रे! फक्रुने दादीचं कोडं सोडवलं होतं.

मग काय? एक क्षणही वाया न घालवता त्याने घरी नेण्यासाठी एक मोठा गोल माठ विकत घेतला. तो उत्साहाने पळत घरी आला आणि त्याने अम्मीला त्याने आणलेला नाव ‘फ्रिज’ दाखवला - फक्रुद्दिनचा फ्रिज!

केवळ काळजी करत बसल्याने काळजीचं कारण दूर होणार थोडीच? फक्त प्रश्नांचा विचार करत बसलं, तर उत्तरं मिळणार थोडीच? फक्रुसारखं आपणही पडायला हवं बाहेर उपायांच्या शोधात नाही, तर आपण राहू कायमचे ‘फिक्रु’द्दिन, नाही का?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.