'टू बिग टू फेल'
esakal December 08, 2025 10:45 AM

डॉ. वीरेंद्र ताटके (गुंतवणूक विषयाचे अभ्यासक)

अर्थबोध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँका देशांतर्गत प्रणालीदृष्ट्या महत्त्वपूर्ण बँका म्हणजेच डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इंपॉर्टंट बँक्स (D-SIBs) म्हणून जाहीर झाल्या आहेत. या बँकांना ‘टू बिग टू फेल’ बँका असेही संबोधले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाला हे मानांकन २०१५ पासून आहे, तर आयसीआयसीआय बँकेला हे मानांकन २०१६ मध्ये मिळाले आणि एचडीएफसी बँकेचा २०१७ मध्ये या यादीत समावेश झाला. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील कामगिरीनुसार या यादीत या बँकांचा समावेश पुढील कालावधीसाठी झाला आहे. या श्रेणीत समावेश करताना रिझर्व्ह बँकेने प्रामुख्याने अनेक मुद्दे लक्षात घेतले आहेत.

अतिरिक्त भांडवल

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार आता या तीनही बँकांना अतिरिक्त भांडवल ठेवावे लागणार आहे. यामध्ये कॉमन इक्विटी टियर १ आणि कॅपिटल कन्झर्व्हे शन बफर या दोन्हीचा समावेश आहे. कॉमन इक्विटी टियर १ हा प्रत्येक भांडवलातील मुख्य घटक असतो, जो बँकेची आर्थिक स्थिती दर्शवतो. संकटाच्या काळातही बँकेची आर्थिक स्थिती भक्कम ठेवण्यासाठी आणि आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी हे भांडवल उपयोगी पडते, तर कॅपिटल कन्झर्व्हेशन बफर हे भांडवल बँकेची आर्थिक तब्येत अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या देशातील सर्वांत मोठ्या बँका आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे या तीनही बँकांच्या भांडवलाचा पाया अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

वर्गीकरणाचे कारण

या बँका आकारमानाने देशातील सर्वांत मोठ्या बँका आहेत. त्यांचे कामकाजदेखील विविध क्षेत्रात विभागलेले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये या बँकांचा मोठा हातभार आहे. दुर्दैवाने या बँकांच्या कामकाजात काही बिघाड निर्माण झाला, तर त्याचा मोठा विपरीत परिणाम संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो. अर्थात, सद्यःस्थिती पाहता या बँका अत्यंत भक्कम स्थितीत आहेत.

सर्वसामान्यांसाठी अर्थ

सर्वसामान्य गुंतवणूकदाराने रिझर्व्ह बँकेच्या या परिपत्रकाचा अर्थ काय आहे आणि त्यानुसार स्वतःच्या गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावा, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. रिझर्व्ह बँकेने या परिपत्रकाद्वारे या तीनही बँका खातेदारांसाठी अत्यंत सुरक्षित आहेत, असे सांगितले आहे. आपले बँक खाते या तीन बँकांपैकी एका बँकेत असेल, तर आपले खाते अत्यंत सुरक्षित आहे, असे समजायला हरकत नाही; तसेच गुंतवणुकीसाठी आपल्याला सुरक्षित पर्याय हवा असेल, तर या बँकांच्या मुदत ठेवींसारख्या योजनांमध्येदेखील आपली रक्कम गुंतवण्यास हरकत नाही. अर्थात त्यावर मिळणार परतावा आणि इतर गुंतवणूक पर्यायांवर मिळणारा परतावा याची तुलना करायला हवी.

कमीतकमी जोखीम घेऊन आपल्याला एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर या तीन बँकांच्या शेअरचाही विचार करायला हरकत नाही. अर्थात, कोणत्या भावाला किती रक्कम गुंतवावी यासाठी वेगळा अभ्यास करायला हवा. तसेच या तीन बँका सोडून इतर बँका तुलनेने कमी सुरक्षित आहेत, असा या परिपत्रकाचा अर्थ अजिबात नाही, हे लक्षात घ्यावे. फक्त या बँकांच्या अवाढव्य आकाराचा विचार करून ‘या तीन बँका इतक्या मोठ्या आणि भक्कम आहेत, की त्या सहजपणे कोसळणार नाहीत,’ असा संदेश देऊन सर्वसामान्य लोकांना निर्धास्त करणे हा या परिपत्रकाचा हेतू आहे, हे लक्षात ठेवावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.