उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर पोलिसांच्या सतर्क आणि वेगवान कारवाईमुळे सोनसाखळी; तसेच दुचाकीचोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणारा एक गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अमरडाय कंपनी, शहाड परिसरात रचलेल्या अचूक सापळ्यात त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
भिवंडी येथील एक सोनसाखळी आणि दुचाकीचोर शहाड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई नितीन बैसाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. वरिष्ठ निरीक्षक आव्हाड यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय काजारी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सुरेश जाधव, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील आणि चालक पोलिस शिपाई अविनाश पवार यांनी अमरडाय परिसरात सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान संशयित शेरअली इमाम फकीर (वय २१, रा. गायत्री नगर, भिवंडी) हा पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तसेच त्याने साथीदार मुसा आणू इराणी याच्यासह उल्हासनगर परिसरात दोन ठिकाणी सोनसाखळी चोरल्याची कबुलीही दिली. पुढील तपासात हिललाईन आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात दुचाकी ५० हजार रुपये, अर्धे तुटलेले १० ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र (एक लाख रुपये), १५ ग्रॅमचे सोन्याचे बोरमाळ (दीड लाख रुपये) असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासासाठी हिललाईन पोलिस ठाण्यात लेखी अहवालासह आरोपीला सुपूर्द करण्यात आले आहे.