09469
टेबल टेनिसमध्ये
तोरसकरचे यश
मालवण ः टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्यस्तरीय स्पर्धा नुकत्याच नांदेड येथे झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला. रजत तोरसकर व त्याच्या संघाने या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला व सुवर्णपदक पटकावले. मागील दोन वर्षांत नागपूर संघाने रौप्य व रजत पदक पटकावले होते. रजत हा येथील टोपीवाला हायस्कूल आणि स. का. पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने टेबलटेनिसचे प्राथमिक धडे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीत गिरवले आहेत. नुकत्याच झालेल्या राजस्थान येथील खेलो इंडिया टेबल टेनिस स्पर्धेमध्ये त्याने आणि संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
.....................
09470
निबंध स्पर्धेमध्ये
वेदा राऊळ प्रथम
सावंतवाडी ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वेदा राऊळ हिने सहावी ते आठवी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे पार पडले. या प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत तिने हे यश मिळविले. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. वेदाने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.