फलटणच्या महिला डॉक्टरचा मृत्यू गळा दाबल्यानं नाही, हातावरचं अक्षर तिचंच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती
esakal December 10, 2025 10:45 AM

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेवेळी मोठी माहिती दिली. महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळा दाबून झालेला नाहीय. तिने गळफास घेतल्यानंच मृत्यू झाला असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मंगळवारी विधानसभेतल्या चर्चेवेळी त्यांनी ही माहिती दिलीय.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिला डॉक्टरच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दोन गोष्टी समोर आल्या आहेत. एक म्हणजे तिच्या हातावर लिहिलेला मजकूर हा तिनेच लिहिला होता. तिचंच हस्ताक्षर होतं हे स्पष्ट झालंय. तर दुसरी गोष्ट म्हणजे तिनं गळफास घेतल्यानंच तिचा मृत्यू झाला आहे.

पीएसआय गोपाळ बदने यानं महिला डॉक्टरची फसवणूक केली. तिचं शारीरिक शोषण केलं. मोबाईल चॅटमधून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. बदने यानं लग्नाचं आमिष दाखवलं पण नंतर वेगळी भूमिका घेतली. तरुणीनं सुसाइड नोटमध्ये गोपाळ बदने आणि दुसऱ्या एका तरुणाचं नाव लिहिलं होतं. तिची फसवणूक करून शारीरिक शोषण तो करत होता. दुसऱ्या तरुणानंही परिस्थितीचा फायदा घेत तिची फसवणूक केली. यातूनच तिनं आत्महत्या केलीय. या प्रकरणाचा तपास अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

घरातच शत्रू पाळलाय, दानवेंना तटकरेंनी व्हिडीओ पाठवला; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

खोटे अहवाल देण्यासाठी पोलिसांकडून दबाव असायचा या आरोपांवर फडणवीस म्हणाले की, तरुणी मेडिकल ऑफिसर होती. एखाद्या आरोपीला अटकेनंतर वैद्यकीय अहवाल घ्यावा लागतो. डॉ़क्टर तरुणीनं काही आरोपी अनफिट असल्याचे रिपोर्ट दिले होते. त्यासंदर्भात पोलिसांनी तिच्या वरिष्ठांना पत्र लिहिलं होतं. संबंधित आरोपींना मोठ्या गुन्ह्यात पकडलं होतं आणि त्यांना अनफिट प्रमाणपत्र दिलं होतं याची चौकशीही झाली. हे सगळं पाच महिने आधी घडलं होतं. त्यामुळे पोलिसांच्या दबावाचा आणि आत्महत्येचा संबंध नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं.

महिला डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरीत घ्यावं अशी मागणी विधानसभेत करण्यात आली. यावर फडणवीस म्हणाले की, संबंधित महिला डॉक्टर ही कंत्राटी स्वरुपात नोकरीवर होती. कंत्राटी पद्धतीने नोकरीवर असल्यास अनुकंपा लागू होत नाही. मात्र सरकार संवेदनशील असून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना कायद्यानुसार जी मदत करता येईल ती करू.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.