चाकण - चाकण परिसरातही बिबट्या मोठ्या प्रमाणात वावरत आहे. चाकण परिसरात सुमारे ६० बिबटे वावरत असल्याची वनविभागाची माहिती आहे. यापूर्वी चाकण परिसरात काही बिबटे पकडलेले आहेत.अजूनही बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. चाकण वनविभागाच्या हद्दीत ऊस क्षेत्र काही गावात आहे.
त्यामुळे तेथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी २५ पिंजरे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलेला आहे, त्या ठिकाणी पिंजरे तत्काळ लावले जातील, असे चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले.
चाकण, आळंदी, पाईट, अंबोली, वांद्रा , चिंचोशी, कोयाळी, वडगाव घेणंद, दौंडकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी केळगाव, चिंबळी, माजगाव, चऱ्होली, धानोरे, वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सुमारे साडेआठ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे आहेत, यामध्ये कोल्हे, लांडगे, तरस, मोर ,रानडुकरे, ससे व इतर भूचर प्राण्यांचा मोठा वावर आहे.
तसेच वनपरिक्षेत्राच्या जवळ काही गावात मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर वाढलेला आहे हे बिबटे ऊस काढणी झाल्यानंतर परिसरात येतात त्यामुळे अगदी चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही बिबट्या येतो आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होत आहे.
मागच्या आठवड्यात पाईट परिसरात एका बिबट्याने दुचाकीवर चाललेल्या एका तरुणावर हल्ला केला होता त्यात तो तरुण किरकोळ जखमी झाला होता. १५ वर्षांपूर्वी करंजविहिरे गावाजवळील वाकी गावाजवळ बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून त्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चाकण वनपरिक्षेत्रातही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
गेल्या वर्षभरात चाकण वनपरिक्षेत्राच्या हद्दीत कोयाळी, दौंडकरवाडी, चाकण या ठिकाणी तीन बिबटे पिंजऱ्यात पकडले आहेत अजून बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे अजूनही बिबटे पकडले जातील.
- संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी