जुनी सांगवी, ता. ९ ः सांगवी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांची संख्या लक्षणीय वाढली असून सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यायामप्रेमी, धावपटू व मोटारसायकलस्वार यांच्या भटके श्वान वारंवार मागे लागणे, भुंकणे किंवा अचानक रस्ता अडवणे अशा प्रकारचे प्रसंग अनुभवास येत आहेत.
मुख्य रस्ते, बागांसमोरील जागा, वसाहती परिसर तसेच शितोळेनगर नदी किनारा रस्ता, ममता नगर दत्त आश्रम रस्ता, भाजी मंडई सांगवीतील काही गल्ल्यांमध्ये भटक्या श्वानांची गर्दी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. काही ज्येष्ठांनी रात्री तसेच पहाटे फेरफटका मारणे कमी केले असून, अनेक व्यायामप्रेमींच्या दिनचर्येवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने व्यायाम, सायकलींग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पहाटे नागरिक बाहेर पडतात मात्र श्वानांचे भुंकणे, धावत मागे पाठलाग करण्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. याआधीही श्वान चावल्यामुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भटक्या श्वानांची नसबंदी, लसीकरण, श्वान ताबा केंद्रांमध्ये पुनर्वसन तसेच परिसरात नियमित गस्ती वाढविणे यासंबंधी महापालिकेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ज्येष्ठ मंडळींनी केली आहे.
“भटक्या श्वानांवर नियंत्रण नसल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. सकाळी लवकर व्यायामासाठी जाणे देखील कठीण झाले आहे. प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा.”
-रवींद्र निंबाळकर, अध्यक्ष, अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ
हिवाळ्याचे दिवस असल्याने व्यायामप्रेमी मोठ्या संख्येने व्यायामासाठी बाहेर पडतात. ज्येष्ठ मंडळींना श्वानांची भीती वाटते. याचा बंदोबस्त करावा.
-संजय गायकवाड, नागरिक
परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.
-अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.