Child Marriage Crisis: बालविवाहांमुळे आरोग्य धोक्यात; कुपोषणासह कमी वजनाचे बाळ आणि मातामृत्यू दरात वाढ
esakal December 10, 2025 09:45 AM

The Hidden Health Impact of Child Marriages: जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी व वाडा या ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी-परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. गेल्या पाच ते सहा वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. बालविवाहामुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ४,२०० च्या जवळपास बालमृत्यू झालेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू मूदतपूर्व प्रसूती, कमी वजनाची बालके, श्वासोच्छ्रास कोंडून झाले आहेत.

ग्रामीण भागात जागरूकता नसल्याने अल्पवयीन लग्न करण्याची मोठी संख्या आहे. त्याचसोबत लग्न न करता गरोदर राहिल्याच्या अनेक घटना आहेत. या प्रकारामुळे अल्पवयीन माता आरोग्य कक्षाअंतर्गत येत नाहीत. त्या घरीच बाळंतपणाची प्रक्रिया करतात. त्यातूनच बालके कमी वजनाची जन्माला येतात. मुले कमी वजनाची असल्याने त्यांच्या अवयवांचा विकास झालेला नसतो. त्यामुळे बाळ आणि माता दोघेही जोखमीत असतात. त्यातच गरोदर राहिलेल्या अल्पवयीन माता मेहनतीची कामे करीत असल्याने त्यांची जोखीम आणखीन वाढते.

अल्पवयीन विवाह, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाच्या बालकांच्या प्रसूतीवर उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाला फारसे यश आलेले नाही.

रुग्णालयाचे भिजत घोंगडे

कुपोषण व इतर आजारांमुळे होणारे बालमृत्यू, मातामृत्यू तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, याकरिता जव्हार येथे नव्याने २०० खार्टाच्या रुग्णालयाला मान्यता देण्यात आली होती, मात्र या रुग्णालयाचे भिजत घोंगडे कायम आहे.

बालमृत्यू थांबवण्यासाठी सामाजिक जागरूकतेची नितांत गरज आहे. सर्व यंत्रणांनी आरोग्य विभागासह सक्षमपणे काम करणे अपेक्षित आहे. वात्सल्य योजना प्रभावी असून, योग्य वयात लग्नानंतर बाळ ही संकल्पना राबविण्याची मोहीम आणखीन प्रभावी करीत आहोत. यातून बालमृत्यू, मातामृत्यू आणखीन कमी होतील.

- डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

बालक दगावण्याची कारणे
  • गर्भात वाढ थांबणे किंवा कमी वाढ

  • मूदतपूर्व प्रसूती

  • कमी वजनाचे बाळ

  • गर्भधारणेदरम्यान आईला कुपोषण, अॅनिमिया

  • आईला मधुमेह, उच्च रक्तदाब, संसर्ग

  • प्रसूतीदरम्यान संसर्ग

  • सुरक्षित प्रसूती सुविधा उपलब्ध नसणे

  • मातांना पूरक पोषक आहाराची कमतरता

  • जन्मतः श्वासोच्छ्रास कोडणे

  • फुफ्फुस विकार

विविध आजारांमुळे बळी

जिल्ह्यात आतापर्यंत कमी दिवसांत जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय आहे. मुदतपूर्व प्रसूती जन्मतः श्वासोच्छ्रास कोंडून, तीव्र फुफ्फुस विकार, अपघात, जन्मतः व्यंग, जंतूसंसर्ग, प्राणी व सर्पदंश, हृदयविकार, ताप, डायरिया, अतिसार, हायपोथेरीमीया, पचनसंस्था दोष, दमा, मैदुज्वर अशा आजारांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

२०२४-२०२५ दरम्यानची जिल्हा आकडेवारी
  • एकूण प्रसूती २५,९२७

  • जन्मलेली बालक २५,८८८

  • बालमृत्यू २१२

  • अर्भक मृत्यू १६२

  • मातामृत्यू १६

२०१५ ते ७ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या बालमृत्यूची आकडेवारी
  • श्वासोच्छास कोंडणे २८७

  • न्यूमोनिया ३२५

  • कमी वजनाची दगावलेली बालके ३१६

  • एकूण बालमृत्यू ४,२५८

  • मूदतपूर्व प्रसूती ४२४

  • तीव्र फुफ्फुस विकार २८२

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.