Pakistan Fake Wedding : पाकिस्तान हा असा देश आहे जिथे कधीही काहीही होऊ शकते. सध्या पाकिस्तानात फेक वेडिंगचा (खोटे लग्न) ट्रेंड आला आहे. अशा प्रकारच्या फेड वेडिंगमध्ये मोठ्या धुमधामीत लग्नाचा कार्यक्रम होतो. पण नवरी आणि नवरदेवाला एकत्र राहण्याचे बंधन नसते. विशेष म्हणजे या लग्नात नवरदेव आणि नवरी दोघेही महिलाच असतात. नवरदेवाच्या रुपात लग्नासाठी एक महिला लग्नात सजून येत असली तरीही हा काही समलैंगिक विवाह नसतो. त्यामुळेच या लग्नात नेमकं काय होतं? लग्नानंतर नवरी-नवरदेव एकमेकांसोबत का रहात नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….
एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये 2023 सालापासून अशा प्रकारच्या फेक वेडिंगचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा लग्नात खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणेच सर्व प्रथा-परंपरा पाळल्या जातात. नटून थटून लोक लग्नात सहभागी होतात. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या लग्नाची विशेष क्रेझ आहे. समाजाच्या दबावाला झुगारून मुक्तपणे आनंद घेता यावा, लग्नाच्या प्रथा, परंपरांमध्ये सहभागी होऊन उत्सव साजरा करता यावा, म्हणून अशा प्रकारच्या फेक वेडिंगचे पाकिस्तानात आयोजन केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लाहोर येथील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) तर्फे 2023 साली सर्वप्रथम अशा फेक वेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या फेक वेडिंगला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. विशेष म्हणजे या फेक वेडिंगची तेव्हा जागतिक माध्यमांनाही दखल घेतली होती. तेव्हापासून फेक वेडिंग आयोजित करण्याचे प्रमाण वाढले. परंतु पाकिस्तानात एक वर्ग या फेक वेडिंगच्या उत्सवाला पाठिंबा देत असला तरी काही लोक मात्र त्यावर टीका करत आहेत.
LUMS मध्ये सर्वप्रथम फेक वेडिंग आयोजित केल्यानंतर हे विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. या फेक वेडिंगमध्ये नवरदेव म्हणून लग्नमंडपात आलेल्या मुलीला नंतर भविष्यात खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच विद्यापीठ प्रशासनावरही टीका करण्यात आली. सोशल मीडियावरील ट्रेलिंगनंतर मात्र आता विद्यापठ प्रशासनाकडून काही खबरदारी घेतली जात आहे. विद्यापीठातील अशा कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.