प्रसाद कानडे
पुणे : पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती सध्या ताशी १३० किलोमीटर इतकी आहे. मात्र येत्या काळात त्यात वाढ होणार असून प्रवासी गाड्या ताशी १६० किलोमीटर वेगाने धावतील. रेल्वे प्रशासनाने रुळ अद्ययावत (ट्रॅक अपग्रेडेशनसह स्कॉट ट्रान्सफॉर्म, ३ फेज मधून वीज संतुलित पद्धतीने २ फेजमध्ये बदलणे) करण्याचे कामदेखील हाती घेतले आहे.
यामुळे रेल्वे गाड्यांना होणारा वीजपुरवठा हा अधिक क्षमतेचा होणार आहे. परिणामी रेल्वे गाड्या या १६० किमी वेगाने धावतील. याचा फायदा पुण्याहून धावणाऱ्या सुमारे १६० रेल्वे गाड्यांना, तर दैनंदिन प्रवास करणाऱ्या पावणेदोन लाख प्रवाशांना होणार आहे.
पुणे रेल्वेस्थानक हे देशातील सुवर्ण चतुष्कोण लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे. मुंबई-चेन्नई लोहमार्गावर विविध विभागांतर्गत वीजयंत्रणेच्या अद्ययावतीकरणाचे (स्कॉट ट्रान्सफॉर्म) काम सुरू झाले आहे. मुंबई विभागात तांत्रिक कारणांमुळे हे करणे शक्य नाही. त्याची सुरुवात पुणे विभागातून सुरू झाले आहे. लोणावळा-पुणे-दौंड या मार्गावर हे केले जाणार आहे.
याची सुरुवात झाली असून, यामुळे रेल्वेच्या अतिउच्च वीज यंत्रांना (ओव्हरहेड इक्विपमेंट-ओएचइ) वीजपुरवठाचे प्रमाण वाढविण्यासाठी वायर बदलण्याची गरज राहणार नाही. सध्या रेल्वेच्या ‘ओएचई’मधून २५ हजार व्होल्टचा पुरवठा होतो. ‘कॉन्टॅक्ट वायर’च्या माध्यमातून रेल्वे इंजिनच्या वर असलेल्या ‘पँटोग्राफ’द्वारे इंजिनच्या चाकाला जोडलेली मोटार वीज घेते. याद्वारे इंजिनला वीजपुरवठा होतो अन् रेल्वे धावण्यास सुरुवात करते.
रेल्वेची गती कशी वाढणारस्कॉट ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रीडवर निर्माण होणारा असंतुलित भार कमी होतो. यामुळे राष्ट्रीय विजेची स्थिरता टिकून राहते, जो ऊर्जेच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा घटक आहे.
या प्रणालीमध्ये विजेचा उच्च दाब वापर होत असल्याने लांब अंतरावरही वीज गळती होत नाही. यामुळे रेल्वे इंजिनांना सतत आणि स्थिर वीज मिळते. पूर्ण क्षमतेने वापर शक्य.
इंजिनला स्थिर आणि उच्चदाबाची वीज मिळाल्याने इंजिन कमी वेळेत वेग पकडू शकते आणि जास्त वेगाने धावू शकते. यामुळे रेल्वेच्या सरासरी गतीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
काय आहे रेल्वेचे मिशन रफ्ताररेल्वे प्रशासन देशातील महत्त्वाच्या लोहमार्गांवर गाड्यांची गती वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे.
त्यासाठी केवळ इंजिनची क्षमता वाढवून चालणार नाही, त्यामुळे रेल्वे अन्य बाबींवरदेखील काम करत आहे.
रुळांची क्षमता वाढविणे, पूर्वी रुळ ५२ किलो वजनाचे होते, आता ६० किलो वजनाच्या रुळांचा वापर सुरू आहे.
सिग्नल प्रणालीत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा वापर आदी
पुणे रेल्वेस्थानक
१६०
दररोज धावणाऱ्या प्रवासी रेल्वे
१,७५,000
दैनंदिन प्रवासी संख्या
२० ते २५
गती वाढल्यामुळे प्रवाशांचे इतकी मिनिटे वाचणार
रेल्वेगाड्यांना होणारा वीजपुरवठा वाढविण्यासाठी ‘स्कॉट ट्रान्सफॉर्म’ प्रणालीचा वापर होतो. लोणावळा-पुणे व पुणे-दौंडदरम्यान याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे वीज गळती होणार नाही.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे