कणकवली : तालुक्यातील कासार्डे-तर्फेवाडी येथील तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने खासगी रुग्णालयाची (Kankavli News) तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला. यावेळी जमावाकडून डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती समजताच मोठा पोलिस फौजफाटा रुग्णालयात तैनात केला होता. तरीही जमाव ऐकत नसल्याने दंगल नियंत्रक पथकाच्या तुकडीलही पाचारण केले.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी मृत तरुणीच्या नातेवाइकांशी मोबाईलवरून संवाद साधल्यानंतर वातावरण निवळले. त्यानंतर खासगी रुग्णालयाच्या दारात ठेवलेला मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. आजच्या घटनेत शहरातील त्या रुग्णालयाच्या समोरील भागाच्या काचा फोडण्यात आल्या. छताचेही मोठे नुकसान करण्यात आले. दुपारी साडेअकरा वाजता सुरू झालेला हा तणाव दुपारी अडीचपर्यंत कायम होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कासार्डे येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय १९) ही डेरवण येथील नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या मानेच्या वरील भागात डाव्या बाजूला एक गाठ आली होती. त्यावर उपचार करण्यासाठी कस्तुरी ही नातेवाइकांसह शुक्रवारी (ता. १२) शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाली. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचला तिच्यावर शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकली. मात्र, रात्री तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी शनिवारी (ता. १३) दुपारी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना आज पहाटे सहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
धक्कादायक प्रकार! मोहसिनचे दुसऱ्या मुलीसोबत होते प्रेमसंबंध, घरच्यांनी दुसरीकडेच लावलं लग्न; रागाच्या भरात सुऱ्याने पत्नीचा चिरला गळात्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास कस्तुरीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी शस्त्रक्रिया झालेल्या खासगी रुग्णालयाच्या दारात आणला. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी कोणत्याही परिपूर्ण चाचण्या केल्या नाहीत. त्यामुळे रुग्ण दगावला असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. या मुद्द्यावर रुग्णालयातील डॉक्टर आणि मृताचे नातेवाईक यांच्यात वादंग झाला. त्यानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. दुपारी एक वाजेपर्यंत एक हजाराहून अधिक नागरिक रुग्णालय परिसरात जमले. त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि मृत युवतीचे नातेवाईक यांच्यातील चर्चा संपली आणि रुग्णालयाची तोडफोड सुरू झाली.
त्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यातून पोलिसांची जादा कुमक मागविली. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, कणकवलीचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा रुग्णालय परिसरात आणला. दंगल नियंत्रक पथकही रुग्णालय परिसरात सज्ज केले. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांचा संताप कायम होता. या दरम्यान ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्यांना त्या परिसरात येऊ दिले नाही.
रुग्णालय परिसरातील वातावरण तणावाचे असताना दुपारी अडीचच्या सुमारास पालकमंत्री नीतेश राणे यांनी मृत कस्तुरीच्या कुटुंबीयांशी, नातेवाइकांशी संवाद साधला. ‘कायदा हातात घेऊ नका, या प्रकरणी तुम्हाला न्याय मिळवून देतो,’ अशी ग्वाही दिली. यानंतर कस्तुरीचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर रुग्णालय परिसरातील तणाव निवळला. तसेच कासार्डे, तळेरे या भागातील ग्रामस्थांसह शहरातील नागरिक, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही तेथून काढता पाय घेतला. दुपारी तीननंतर रुग्णालय परिसरातील वातावरण निवळले. मात्र, अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त कायम होता. कस्तुरीच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी कस्तुरीचे नातेवाईक तसेच रुग्णालय प्रशासनाकडून सायंकाळी उशिरापर्यंत तक्रारी दाखल झाल्या नव्हत्या. मात्र, दोन्ही बाजूकडून निश्चितपणे तक्रारी दाखल होतील. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक साटम यांनी दिली.
धक्काबुक्की, तोडफोडकस्तुरीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त झाले. यात काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागातील काचा दगड मारून फोडल्या. सिलिंग फॅनची नासधूस केली. तसेच छताचेही मोठे नुकसान केले. सुरुवातीच्या सत्रात दोन महिला डॉक्टर आणि नर्सेस यांनाही धक्काबुक्कीचा प्रकार झाला होता. दरम्यान, या तोडफोड प्रकरणात कासार्डे येथील ग्रामस्थांपेक्षा कणकवली शहर तसेच लगतच्या परिसरातील राजकीय कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे आज दिसून आले.
Latur Crime : हातपाय बांधून जिवंत जाळलं! चार तास जळत राहिली कार, तडफडून तडफडून तरुणाचा अंत; अनैतिक संबंधातून क्रूर कृत्य? उपजिल्हा रुग्णालयातही बंदोबस्तदुपारी तीन वाजता कस्तुरी पाताडे हिचा मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणला. सायंकाळी उशिरापर्यंत विच्छेदन प्रक्रिया सुरू होती. त्या कालावधीत कासार्डे ग्रामस्थ तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठाण मांडून होते. तसेच खासगी रुग्णालयाच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला जात होता. यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘आमच्याकडून सर्वतोपरी साह्य’कस्तुरी पाताडे ही मानेवरील भागातील गाठ काढण्यासाठी आमच्या रुग्णालयात आली. शस्त्रक्रियेपूर्वी तिच्या सर्व फिटनेस चाचण्या केल्या. तसेच शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. तिच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब सर्व काही नियंत्रित होते. मात्र, तिला अस्थमा किंवा अन्य काही आजार असल्याने तिचा रक्तदाब वाढला. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूर येथे जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाइकांनी कोल्हापूर येथे जाणार, असे सांगितल्याने आम्ही आमची रुग्णवाहिका आणि एक तज्ज्ञ डॉक्टर सोबत दिला. त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले.
मात्र, तेथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. कस्तुरीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाइकांकडून भरपाईची मागणी करण्यात आली. त्यावेळी आधी मृतदेहाचे विच्छेदन होऊ द्या. त्या अहवालात आमची चूक दिसून आली तर निश्चितपणे भरपाई देऊ, अशी ग्वाही दिली आहे. हीच भूमिका आम्ही तिच्या नातेवाइकांपुढे मांडली. तरीही आमच्या रुग्णालयाची तोडफोड झाली ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, त्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार करणार नाही, अशी भूमिका कस्तुरीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनंत नागवेकर, डॉ. कीर्ती नागवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.