युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार
सतीश मोरे ः गुहागरात भाजप कार्यकर्त्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५: तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा आपण प्रामाणिकपणे लढवायच्या आहेत. युतीचा निर्णय काय करावा, या संदर्भात वरिष्ठ नेते आपले मत निश्चितच विचारात घेतील, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केले.
गुहागर येथील भाजपच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १२) आयोजित बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रारंभही करण्यात आला. या बैठकीला तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष मंगेश रांगळे उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांनी गुहागर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद समितीमधील कार्यकर्त्यांशी या वेळी चर्चा केली. स्थानिक पातळीवरील स्थिती समजून घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांनी या वेळी युती होणार की नाही, स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत प्रदेश भाजपचे मत काय आहे, यावर माहिती दिली. या वेळी मोरे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निर्णयाप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे. नुकतीच गुहागर नगरपंचायत निवडणूक यशस्वीपणे लढवली आहे. त्यामध्ये यश आपलेच आहे. तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी येऊ घातलेल्या दिवसांमध्ये कशाप्रकारे नियोजन करावे. प्रत्येक गटात कार्यकर्त्यांनी एकत्रपणे फिरण्याचे आवाहन त्यांनी केले.