पोईसर नदी कात टाकणार!
esakal December 15, 2025 05:45 AM

पोईसर नदी कात टाकणार!
चार कोटींचा निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पोईसर नदीच्या सौंदर्याकरणासाठी आवश्यक असलेल्या सांडपाणी व मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. त्याबरोबरच आर दक्षिण विभागातील कांदिवलीमधील संजयनगर, जनता कॉलनी परिसरातील गल्ल्यांची दुरुस्तीदेखील केली जाणार आहे.
या कामांसाठी एकूण ६.४२ कोटी निधीची आवश्यकता असून, विभागाकडे सध्या पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने घनकचरा व्यवस्थापन खात्यातील विविध विभागातील निधी वळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या वेगवेगळ्या निधी केंद्रांतील शिल्लक तरतूदीतून एकूण चार कोटी निधी वळवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी काही तरतुदी वापरण्यात येणार आहेत. यामध्ये ओला-सुका कचरा साठवणूक वाहनासाठी ५४ लाख, आरसीसी नसलेल्या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी ४० लाख, सुका कचरा केंद्र शेड सुधारणा ५० लाख, नवीन चौक्या बांधणी/नूतनीकरण ६४ लाख, आर-दक्षिण विभागातील इतर तरतुदी १७ लाख, कांजूरमार्ग क्षेपणभूमी विकास १.७५ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या सर्व स्रोतांमधून मिळणारा निधी एकत्र करून चार कोटी रुपये वळवण्यात येणार आहे.

एसटीपी जोडणीचे काम
स्थायी समिती/महापालिका किंवा सध्या अधिकार प्राप्त प्रशासक यांची मंजुरी या प्रस्तावासाठी आवश्यक आहे. या मंजुरीनंतर संजयनगर, जनता कॉलनी परिसरातील गल्ल्यांची दुरुस्ती, न्यू लिंक रोड ते एकतानगरपर्यंत सांडपाणी वाहिनी घालणे आणि एसटीपी जोडणीचे काम गतीने सुरू होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.