करून दाखवलं म्हणता-म्हणता… शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, व्यंगचित्र शेअर करत साधला निशाणा
Tv9 Marathi December 17, 2025 12:45 AM

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल सध्या वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय भेटीगाठी, युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटना वेगाने घडत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाची पहिली सभा वरळीत पार पडत आहे. आता या सभेवरुन शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंना डिवचले आहे.

शिंदे गटाने उडवली ठाकरे गटाची खिल्ली

मुंबईसह राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे. वरळीमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेने सभेचे आयोजन केले आहे. या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांनी करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया अशी घोषणा दिली होती. आता याच घोषणेवरुन शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे.

शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या ट्वीटरवर एका व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात त्यांनी यात धुरंधर सिनेमातील गाजत असलेल्या रेहमान डकैत या पात्राचा आधार घेत उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र काढले आहे. त्यात हे पात्र खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया असं म्हणत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. यावर खाऊन नव्हे करून म्हणा असे हे दोघे सांगताना दिसत आहेत.

करून दाखवलं म्हणता-म्हणता
खाऊन दाखवलंची आली पाळी,
रेहमान डकैतचं पोट फुगलं
मुंबईकर ठरले त्याचे बळी!#Shivsena #Maharashtra pic.twitter.com/Pa5hQeBTEd

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc)

ठाकरे गटावर टीका

गेल्या २५ वर्षांत ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. यादरम्यान सव्वा लाख कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. असे असताना हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेक जण ठाकरे गटावर टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या प्रमुख शहरांसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्य पातळीवरील राजकारणही प्रचारात महत्त्वाचे ठरत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.