राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी लागणार आहे. अशातच आज भाजपच्या स्वबळाच्या घोषणेच्या एका दिवसांनंतर अजित पवारांनी आपली पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पिंपरी चिंडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अनेक पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशसमोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट यांच्यासह शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढली आहे. तर भाजप आणि शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबत अनेक माजी भाजपसह इतर पक्षांचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज झालेल्या पक्षप्रवेशाबाबत माहिती देताना अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी म्हटले की, ‘आज माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव कामी येईल आणि त्यातून जनसेवा घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती?आज माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव कामी येईल आणि त्यातून जनसेवा घडेल,… pic.twitter.com/10TSfO0IXz
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks)
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची नुकतीच बैठक झाली. नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दादांना देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात असं सांगणारं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.