भारतात आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गतविजेता टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या स्पर्धेत ट्रॉफी राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. तर त्याआधी झिंबाब्वे आणि नामिबियात अंडर 19 वनडे वर्ल्ड कप 2026 स्पर्धा (U19 Odi World 2026) खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने (U19 West Indies Sqaud) संघ जाहीर केला आहे. विंडीज क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
विंडीजने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जोशुआ डोर्न हा या स्पर्धेत विंडीजचं नेतृत्व करणार आहे. तर जोनाथन व्हॅन लँगे याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबादारी असणार आहे. विंडीज या मोहिमेत साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. तर त्याआधी विंडीजला 2 सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. विंडीजसमोर या स्पर्धेतील साखली फेरीत तांझानिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. विंडीज या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 15 जानेवारीला तांझानिया विरुद्ध खेळणार आहे.
पहिला सामना, 15 जानेवारी, विरुद्ध तांझानिया
दुसरा सामना, 18 जानेवारी, विरुद्ध अफगाणिस्तान
तिसरा सामना, 22 जानेवारी, विरुद्ध दक्षिण आफ्रिका
तसेच विंडीजसमोर सराव सामन्यात आयर्लंड आणि जपानचं आव्हान असणार आहे. हे क्रिकेट सामने जरी औपचारिकता असले तरी या प्रमुख स्पर्धेच्या हिशोबाने फार महत्त्वाचे ठरतात.
पहिला सराव सामना, 10 जानेवारी, विरुद्ध आयर्लंड
दुसरा सराव सामना, 13 जानेवारी, विरुद्ध जपान
अंडर 19 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विंडीज टीम : जोशुआ डोर्न (कर्णधार), जोनाथन व्हॅन लँगे (उपकर्णधार) ज्वेल अँड्र्यू, शमार ॲपल, शाक्वान बेल, झॅक्री कार्टर, तानेझ फ्रान्सिस, आरजाय गिटेन्स, विटेल लॉज, मायका मॅकेन्झी, मॅथ्यू मिलर, इस्राएल मॉर्टन, जकीम पोलार्ड, आदियान रचा आणि कुणाल तिलोकानी.
दरम्यान या स्पर्धेत 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान एकूण 41 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सहभागी 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. साखळी फेरीतील अव्वल 2 संघ सुपर 8 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल 4 संघात उपांत्य फेरीचा थरार रंगेल. उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित होतील आणि त्यानंतर वर्ल्ड कप विजेता संघ कोण असणार? हे स्पष्ट होईल.