मलकापूर : कऱ्हाडच्या दिशेने निघालेली जीप गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले. यात जीपचेही नुकसान झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर एनपी मोटर्ससमोर सुरक्षिततेचा उपाय नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.
घटनास्थळावरील माहितीनुसार; जीपमधून (एमएच ११ डीएच ६५३१) तिघे जण कऱ्हाडच्या दिशेने येत होते. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील एनपी मोटर्ससमोर सेवारस्त्यावर जाण्यासाठी छोटा रस्ता आहे. त्यावर वळण घेताना सुरक्षिततेचा कोणताही उपाय नसल्यामुळे जीप नाल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाली.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त जीप सरळ करून त्यातील तिघांना बाहेर काढले. तिघेही किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.