एकमेकांविरुद्ध लढलो तरी महायुती म्हणून एकत्रच
esakal December 21, 2025 12:45 PM

12030

एकमेकांविरुद्ध लढलो तरी
महायुती म्हणून एकत्रच

नीतेश राणे ः हत्तीप्रश्नी वनविभागाला पूर्ण सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होत असतो. या निवडणुकांमध्ये जरी स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांसमोर लढत असलो तरी या लढती मैत्रिपूर्ण असतात. त्यामुळे जेव्हा जिल्ह्याच्या विकासाचा विषय असतो, त्यावेळी आम्ही एकाच व्यासपीठावर असतो. शेवटी महायुती म्हणून आम्ही एकच असून कोकणचा विकास हेच आमचे ध्येय आहे. उद्या (ता. २१) जाहीर होणाऱ्या निकालात विजय हा महायुतीचाच होईल, महाविकास आघाडी औषधाला देखील शिल्लक राहणार नाही, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री राणे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. राणे म्हणाले, ‘फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून सह्याद्री पट्ट्यातील स्थानिक गावांचे अर्थकारण पूर्णपणे बदलणार आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांनी अशा विविध प्रकल्पांना चालना दिली आहे. माझ्या मतदारसंघातील वैभववाडी येथे साकारलेला काचेचा पूल असो किंवा जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत साकारलेले इतर अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. त्यामुळे या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इतर पायाभूत व मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न राहतील. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या नेतृत्वात वनविभाग जिल्ह्यात चांगले काम करीत आहे. माकड व बिबट्या यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत; मात्र हत्तींचा या ठिकाणी असलेला उपद्रव पाहता त्यांचाही कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी विभागाने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. याबाबत कडक धोरण अवलंबणे आवश्यक आहे.’
..........................
सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभारणार
ओंकार हत्ती सध्या उपद्रवी बनला आहे. काही ठिकाणी तो नासधूस करत आहे. त्यामुळे त्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हा विषय केवळ एका हत्ती पुरताच नसून भविष्यात या गोष्टी टाळण्यासाठी जिल्ह्यात भव्य प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश नाईक यांच्यासारखे ज्येष्ठ व अभ्यासू मंत्री वनविभागाला लाभले आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काही वर्षांतच भव्य प्राणी संग्रहालय उभारण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.