धर्माबाद : धर्माबाद नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२०) मतदान सुरू असतानाच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बन्नाळी भागातील ईनानी मंगल कार्यालयात मतदारांना पैसे वाटपाचा प्रयत्न झाल्याचा आरोप होताच तेथे मोठा गोंधळ उडाला. भाजपचे उमेदवार व कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटण्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे मतदारांना ईनानी मंगल कार्यालयात आणून कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप काही मतदारांनी केला आहे. पैसे वाटप सुरू असतानाच वाद वाढला. काही मतदारांनी आम्हाला जबरदस्तीने आत कोंडल्याचा दावा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोंडून ठेवलेल्या मतदारांना बाहेर काढले.
मतदान केंद्रावरही काही काळ तणावाची स्थिती
दरम्यान, प्रभाग क्रमांक आठमधील यशवंत विद्यालय येथील मतदान केंद्रावरही काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. आमदारांच्या पत्नी व प्रतिनिधी असलेल्या पूनम पवार या मतदार नसतानाही मतदान केंद्रात प्रवेश करताच वादाला तोंड फुटले. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ जुंपली झाली. या वादानंतर मतदान केंद्राच्या बाहेर रस्त्यावर भाजपच्या पूनम पवार व राष्ट्रवादीचे शिरीष गोरठेकर, कैलास गोरठेकर, शिवराज पाटील होटाळकर हे खुर्चा टाकून अर्धा तास ठाण मांडून बसले होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
Satara News: 'साताऱ्यात पालिकेसाठी सरासरी ५८.६० टक्के मतदान'; काही ठिकाणी हाणामारी; अनेक केंद्रांत रात्री उशिरापर्यंत गर्दी !निवडणूक आचारसंहितेनुसार अनधिकृत व्यक्तींना मतदान केंद्रात प्रवेशास मनाई असतानाही झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील व पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.