राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या एकूण 288 जागांची मोजणी सुरू झाली आहे. त्यात नगर परिषदेच्या 246 आणि नगर पंचायतीच्या 42 जागांची मोजणी सुरू आहे. या दोन्ही निवडणुकीत महायुती आघाडीवर आहे. कलांमध्ये महायुती 195 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. भाजपला 111 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गट 47 आणि अजितदादा गट 34 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने 32 जागांवर आघाडी घेऊन चांगली लढत दिली आहे. तर ठाकरे गट 7 आणि शरद पवार गट 8 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, नगर पंचायतीच्या कलांकडे पाहता या निवडणुकीतही भाजपच आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक 24 जागा मिळवून आघाडीवर आहे. तर शिंदे गट 5 जागा मिळवून आघाडीवर आहे. ठाकरे गट एक तर अजितदादा गट 3 जागा मिळवून आघाडीवर आहे. काँग्रेसने 4 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शरद पवार गटाला अजून एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाही. तीच अवस्था मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची आहे. मात्र, शरद पवार गटाला एकाही जागेवर आघाडी न घेता येणं हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर निवडणुकीचं व्यवस्थित प्लानिंग आणि जिंकण्याची जिद्द मनात बाळगूनच मैदानात उतरल्यामुळे भाजपने 24 जागांवर आघाडी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
Maharashtra Nagar Palika Election Results 2025 LIVE : 1 मताने भाजपाच्या उमेदवाराचा विजय
नगर परिषद निवडणुकीतही भाजपच सबकुछ
नगर परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. 100 जागांचा पल्ला गाठणारा भाजप हा राज्यातील एकमेव पक्ष ठरला आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही नेत्रदीपक यश मिळवलं आहे. शिंदे गटाने 46 जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पहिल्या दिवसापासून शिंदे प्रचारात होते. गावागावात जाऊन एकखांबी किल्ला लढवत होते. शिंदे गटाच्या आमदारांनीही जीव ओतून काम केल्यामुळे त्यांच्या पदरात मोठं यश आल्याचं दिसत आहे. दुसरीकडे मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सभा दिसली नाही. उद्धव ठाकरे तर कुठेच सभा घेतना दिसले नाही. त्यामुळेच ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं आहे.