कपूर आडनाव असलेल्या कलाकारांशी कॅमेरा स्वतःहून पटकन मैत्री करतो आणि तेही आपल्यावर कॅमेरा आहे याचा कोणताही दबाव न घेता वावरतात, या गोष्टीचं कौतुक करावे की तणावरहित आयुष्य भरभरून जगण्याच्या त्यांच्या वृत्तीला दाद द्यावी, असा प्रश्न आहे. याचा अर्थ, त्यांना कसलेच दुःख नव्हते वा नाही, कोणत्याच अडचणी वा तणाव नाही, असे अजिबात नाही. ती गोष्ट ते चित्रपटातील पार्श्वसंगीतानुसार आहेत असे मानतात आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतात. रणधीर कपूर हे याचे उत्तम उदाहरण...
रणधीर कपूर यांना एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषी कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ, अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून रणधीर कपूर यांना ओळखू लागले. मग सैफ अली खानचे सासरे ही त्यांची ओळख झाली. आजची डिजिटल पिढी रणधीर कपूर यांना तैमूर व जहांगीरचे आजोबा म्हणून ओळखते. करिश्मा कपूरलाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे. म्हणजे रणधीर कपूर यांना चार नातू. रणबीर कपूर यांचा काका हीदेखील रणधीर कपूर यांची ओळख.
Premium|Shah Rukh Khan Kajol Bollywood Songs : ‘मेरे ख्वाबों में’पासून ‘तुझे देखा तो’पर्यंतचा राजकन्यांचा बॉलिवूड प्रेमप्रवासआज रणधीर कपूर याच कपूर खानदानाचे कुटुंबप्रमुख आहेत. वयाने आणि अनुभवाने मोठे. वडिलोपार्जित अशा चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ या भव्य दिमाखदार वास्तूची विक्री आणि मग पाडाव, दोन्ही लहान सख्ख्या भावांच्या मृत्यूचा आघात, चेंबूर येथील आपल्या मागील पिढीपासूनच्या आर. के. काॅटेज या प्रशस्त वास्तूची विक्री आणि मग त्याचाही पाडाव असे अनेक धक्के पचवत रणधीर कपूर यांची वाटचाल सुरू आहे. ‘एन्जॉय माय लाइफ एव्हरी मुव्हमेंट’ असं मानत व म्हणत ते हे सर्व बाजूला ठेवतात. ‘होना है वो होकर रहेगा’ असं म्हणतच ते परिस्थिती हाताळतात.
अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक हे त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील रूप. त्यासह संगीताचा उत्तम कान असलेले रसिकही ते आहेत. राज कपूर यांचा मुलगा म्हणून ते लहानपणापासून फार लाडात, श्रीमंतीत वाढले. याबाबतच्या कथा-दंतकथा काहीही असू देत, कपूर म्हटले की हे आपोआप येतेच. खुद्द रणधीर कपूर यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय, लहानपणापासून शाळेत बेस्ट बसने जायचो-यायचो. विशेषत: ‘झुक गया आसमान’ या चित्रपटाच्या वेळेस दिग्दर्शक लेख टंडन यांच्याकडे चौथ्या क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक असताना चेंबूरपासून मुंबईतील अनेक स्टुडिओत बेस्ट बसने प्रवास केला. याचे कारण, जनसामान्यांच्या जगण्याची कल्पना यावी आणि राज कपूर यांचा मुलगा म्हणून आपण कोणतेही शौक करू, अशी भावना नको.’’
दिग्दर्शक लेख टंडन यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल करताना चित्रपटसृष्टी आणि चित्रपट माध्यमाचा त्यांनी बराच अनुभव घेत स्वतःची जडणघडण केली. त्यानंतर ‘जीत’ चित्रपटातून नायक म्हणून कारकीर्द सुरू केली. पहिलीच नायिका बबिता, तीच कालांतराने त्यांची पत्नी झाली.
रणधीर कपूर यांच्या कारकिर्दीतील एक सुपर हिट चित्रपट मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रामपूर का लक्ष्मण’(१९७२). दोन वा तीन भाऊ लहानपणी हरवणे आणि गवसणे हे हुकमी मध्यवर्ती सूत्र. एका मुलाचे नाव राम (शत्रुघ्न सिन्हा). त्याचा भाऊ लक्ष्मण (रणधीर कपूर). राम मुंबईत वाढतो; तर लक्ष्मण रामपूर गावात लहानाचा मोठा होतो. मग मुंबईत येतो. येथे त्याची भेट श्रीमंत घरातील रेखा चौधरी (रेखा) हिच्याशी होते. ती लक्ष्मणच्या सरळ स्वभाव आणि साधेपणावर फिदा होते. रणधीर कपूर यांना ही भूमिका फिट्ट बसली. त्या काळातील चित्रपटात रणधीर कपूर यांच्यावर शम्मी कपूर यांचा प्रभाव जाणवतो. ‘रामपूर का लक्ष्मण’च्या खणखणीत यशाने रणधीर कपूर स्टार झाले ही सकारात्मक गोष्ट; पण त्याच साच्यातील भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. त्या भूमिकांनी आपले कलाकार म्हणून बरेच नुकसान झाले, ही रणधीर कपूर यांची भावना.
रणधीर कपूर यांनी अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली. घरचाच चित्रपट होता. १९७१च्या ‘कल आज और कल’च्या वेळेस रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रातदेखील पाऊल ठेवले. त्या काळात या गोष्टीचे विशेष कौतुक झाले. चित्रपटात पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. बबिता नायिका होती. दिग्दर्शन करता करता रणधीर कपूर तिच्या प्रेमात कसे पडले, हे त्यांनाही समजले नाही आणि तिने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे लग्न अतिशय थाटामाटात झाले.
रणधीर कपूर यांनी ‘धरम करम’ (१९७६) आणि ‘हीना’ (१९९१) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘धरम करम’च्या सेटवरील रेखाच्या मोकळ्या वागण्याचे किस्से गाॅसिप्स मुख्य रंगवून खुलवून आले. ‘हीना’ राज कपूर यांचे दीर्घकालीन स्वप्न होते. दोन गाण्यांच्या ध्वनिमुद्रणानंतर राज कपूर यांचे निधन झाल्यानंतर रणधीर कपूर यांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वी केले. ऋषी कपूर व झेबा बख्तियार यांच्यासह अश्विनी भावेला अतिशय उत्तम संधी मिळाली. कपूर बंधूंशी तिचे कायमस्वरूपी चांगलेच संबंध निर्माण झाले. मुंबईत आल्यावर आपण रणधीर कपूर यांना आवर्जून भेटतो, असे एकदा अश्विनी भावेच म्हणाली.
सत्तर-ऐंशीच्या दशकात रणधीर कपूर यांनी ‘जवानी दिवानी’, ‘हाथ की सफाई’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘ढोंगी’, ‘खलिफा’, ‘कच्चा चोर’, ‘कल आज और कल’, ‘पोंगा पंडित’, ‘कस्मे वादे’, ‘बिवी ओ बिवी’, ‘भंवर’, ‘हरजाई’, ‘हमराही’, ‘चाचा भातीजा’, ‘राम भरोसे’, ‘आज का महात्मा’, ‘लफंगे’, ‘खलिफा आखरी डाकू’, ‘पुकार’, ‘कस्मे वादे’ इत्यादी चित्रपटातून भूमिका साकारल्या. रोझ मुव्हीज या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माता व दिग्दर्शक रमेश बहल यांच्याशी ‘जवानी दीवानी’पासूनच रणधीर कपूर यांची खास मैत्री. त्यातील गाणी आजही लोकप्रिय. ‘सामने ये कौन आया दिल में हुई हलचल’ (पार्श्वगायक किशोरकुमार) वगैरे.
‘जवानी दीवानी’ म्हणजे म्युझिकल हिट प्रेमपट. नावातच सगळे काही आले. विशेष म्हणजे रणधीर कपूर आणि जया भादुरी अशी यात रोमॅन्टीक जोडी. राजेश खन्नांच्या सुपर स्टार क्रेझने वातावरण ढवळून काढल्याचा तो काळ आणि त्यात आपला चित्रपट यशस्वी ठरणे इतर नायकांनाही महत्त्वाचे होते.
रमेश बहल यांनी काही वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि ‘कस्मे वादे’ (अमिताभ बच्चन, राखी, रणधीर कपूर, नीतू सिंग), ‘हरजाई’ (रणधीर कपूर आणि टीना मुनिम), पुकार (अमिताभ बच्चन, झीनत अमान, परवीन बाबी, रणधीर कपूर) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. रणधीर कपूर हे त्यांचे फेव्हरेट होते. ‘जवानी दीवानी’पासून त्यांची मैत्री जमली होती... कपूर मैत्रीला पक्के.
Premium|Kausar Munir Lyricist : कौसर मुनीर : एकांडी शिलेदारऐंशीच्या दशकात रणधीर कपूर यांनी चित्रपटातून भूमिका साकारणे जवळपास थांबवले. कालांतराने सावनकुमार दिग्दर्शित ‘मदर’ (१९९९) या चित्रपटात त्यांनी आवर्जून भूमिका साकारलीय. रेखासोबत अनेक वर्षांनी काम करण्याचा योग आल्याने ते सुखावल्याचे फिल्मीस्तान स्टुडिओतील या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी गेलो असता ‘लाइव्ह’ अनुभवले. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आर. के. फिल्म बॅनरखालील ‘प्रेम रोग’ (१९८२), ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५), ‘प्रेम ग्रंथ’ (१९९६) आणि ‘आ अब लौट चले’ (१९९९) च्या निर्मितीत मन रमवले.
रणधीर कपूर यांच्या भेटीची एक विशेष आठवण सांगायलाच हवी. ‘हीना’चा मुंबईवरील चित्रपट समीक्षकांसाठीचा खेळ आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित केला होता. त्यानंतर खास पार्टीही होती. रणधीर कपूर यजमान म्हणून प्रत्येकाला भेटले. गप्पांच्या ओघात ते म्हणाले, ‘‘माझ्या डॅडीच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटाला सगळेच फ्लाॅप म्हणतात, पण रिपीट रन, छोट्या पडद्यासाठीचे हक्क यातून या चित्रपटाने अशी काही कमाई केली की, आमच्या आर. के. फिल्म बॅनरखालील तो सर्वाधिक सुपर हिट चित्रपट ठरलाय.’’ रणधीर कपूर यांचे हे बोल आजही माझ्या कानात घुमताहेत.
आपण नायक साकारला त्या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत, याचे त्यांना विशेष कौतुक. आज मोहम्मद रफी, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे पुन्हा होणे नाही, हे त्यांचे मत. आपले पिता राज कपूर हे केवळ आपले पिता नव्हते, तर अगदी जवळचे विश्वासाचे मित्रदेखील होते. आम्ही चित्रपट आणि चित्रपटसृष्टी यावरच नव्हेतर जगभरातील कोणत्याही विषयावर गप्पा करीत असू. त्यांची मला नेहमीच आठवण येते,’’ असे रणधीर कपूर अतिशय भावुकपणे सांगतात तेव्हा त्यांच्यातील पिता आणि पुत्र यांच्यातील नाते अधिकच दृढ होते.
रणधीर कपूर यांची एकूणच वाटचाल ही त्याची भूमिका असलेल्या ‘कस्मे वादे’ या चित्रपटातील गाण्यात म्हटल्याप्रमाणे आहे,
आती रहेगी बहारे,
जाती रहेगी बहारे
दिल की नजर से
दुनिया को देखो
दुनिया कितनी हंसी है..
(लेखक ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)