Pune Crime : कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात सापडली एक कोटींची रोकड
esakal December 26, 2025 03:45 AM

पुणे - कोंढवा परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आणि रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर घराची झडती घेतली असता चक्क एक कोटींहून अधिक रोकड पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी रोकड जप्त केली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमर कौर ऊर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांकडून काकडे वस्तीमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये गुरुवारी (ता. २५) प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान हातभट्टी दारूचे ८० फुगे, ३५ लिटर क्षमतेचे दोन कॅन आणि विविध ब्रँडच्या व्हिस्की, रम आणि बिअरच्या बाटल्या आणि पॅकेट्स आढळून आले. सुमारे दोन लाख रुपये किमतीचा दारूसाठा आणि एक लाख ४१ हजार रुपये रोख असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरझडतीमध्ये सापडली एक कोटीची रोकड -

या प्रकरणात अमर कौर जुनी, दिलदारसिंग जुनी आणि देवाश्री सिंग हे तिघेजण अवैध दारूविक्री करत असल्याचे उघडकीस आले. आरोपींच्या ताब्यात रोख रक्कम आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपींच्या राहत्या घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान बेडरूममधील कपाटाच्या विविध कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली. त्यानुसार पंचनामा करून सुमारे एक कोटी ८५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. परिमंडळ पाचच्या पोलिस राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अफरोज पठाण आणि तपास पथकाने ही कारवाई केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.