DEVENDRA SHUKLA/GETTY IMAGES
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हिंदू संघटनांनी ख्रिसमसला विरोध करत अनेक ठिकाणी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बुधवारी (24 डिसेंबर) रायपूर येथील मॅग्नेटो मॉलमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची जात आणि धर्म विचारून धमकावण्यात आलं आणि तिथे तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना काँग्रेसने म्हटले आहे की ही घटना तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे.
मॅग्नेटो मॉलच्या मार्केटिंग हेड आभा गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, "मोठ्या संख्येने लोक काठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. ते कर्मचाऱ्यांचे आयडी पाहून तुम्ही हिंदू आहात की ख्रिश्चन? असा प्रश्न विचारत होते."
ख्रिसमसच्या निमित्ताने मॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. हिंदू संघटनांच्या जमावाने त्या सजावटीचीही पूर्णपणे तोडफोड केली. आभा गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार या तोडफोडीत किमान 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
इतर काही भागांतही दुकानदारांना मारहाण झाल्याच्या आणि तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Devendra Shukla छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हिंदू संघटनांनी ख्रिसमसला विरोध करत अनेक ठिकाणी तोडफोड केली. 'पंतप्रधान मोदी, या घटना थेट तुमच्या विचारसरणीचं प्रतिबिंब' - काँग्रेस
या घटनेनंतर काँग्रेसनं भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की 'ही घटना भाजप सरकारचा खरा चेहरा' दाखवते. या व्हीडिओमध्ये काही लोक ख्रिसमसच्या सजावटीची तोडफोड करताना दिसत आहेत.
काँग्रेसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं आहे की, "ही केवळ एक घटना नाही. देशभरात ख्रिसमस साजरा केला म्हणून लोकांना लक्ष्य केलं जात आहे आणि घाबरवलं जात आहे. जबलपूर आणि दिल्लीपासून ते छत्तीसगड, केरळ, ओडिशा, उत्तराखंड आणि इतर अनेक ठिकाणी अल्पसंख्यांक समुदायांना संघटित होऊन लक्ष्य केल्याच्या घटना समोर येत आहेत."
"अशाप्रकारच्या घटना आपल्या देशाच्या स्थितीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करतात, जो नेहमीच एकता आणि विविधतेतील सामर्थ्यामुळे ओळखला गेला आहे."
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी, या घटना थेट तुमच्या विचारसरणीचं प्रतिबिंब आहेत. भारतात अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या घटनांना संपूर्ण जग पाहत आहे."
"आम्ही गप्प बसणार नाही. द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात प्रत्येक समुदायातील आपल्या बंधू-भगिनींसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत," असे काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छाएका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "या प्रकरणात अज्ञात लोकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 115(2), 190, 191(2), 324(2) आणि 331(3) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल."
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एक निवेदन जारी करून राज्यातील नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
https://x.com/vishnudsai छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय
त्यांनी सांगितलं की, ख्रिसमसचा सण प्रेम, करुणा, त्याग आणि सेवेची भावना मजबूत करण्याचा संदेश देतो.
ख्रिसमसचा हा सण राज्यातील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद, चांगले आरोग्य, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो, तसेच सर्वांच्या प्रयत्नांतून छत्तीसगड अखंड प्रगतीच्या वाटेवर राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.