Water Issue : येते १४७ एमएलडी पाणी; पण जाते कुठे? नियोजनावर प्रश्नचिन्ह
esakal December 26, 2025 05:45 PM

छत्रपती संभाजीनगर - ऐन महापालिका निवडणुकीत शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. वारंवार येणारे तांत्रिक बिघाड तसेच रोहित्र आणि पाणी उपसा पंप बंद असल्याने शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

असे असताना शहरात रोज तब्बल १४७ एमएलडी पाणी मिळत असून, केवळ १७ एमएलडी पाणी कमी येत आहे. त्यामुळे नियोजनाअभावी पाणीटंचाई जाणवत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे प्रचार भरात येत असताना दुसरीकडे दहा दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. आठ ते दहा दिवसांत दोन वेळा जलवाहिनी फुटली तर वीज खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यात रोहित्र आणि पंप खराब झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगितले जात आहे.

शहराला १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून ९८ ते १०५ एमएलडी पाणी मिळते तर ५६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून ३५ एमएलडी व २६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून २२ एमएलडी पाणी मिळते. या तिन्ही योजनेतून रोज १६२ एमएलडी पाणी मिळत आहे.

परंतु, पंप बंद असल्याने तीनही योजनेतून सध्या शहरात १४७ एमएलडी पाणी येत आहे. १४७ एमएलडी पाण्याचे योग्य रितीने वितरण करण्याचे नियोजन केले जात नसल्यामुळेच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.